कळंबा : पर्यावरणपूरक होळी साजरी करण्यासाठी उपनगरातील संयुक्त उपनगर शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने पुढाकार घेण्यात आला असून ‘‘होळी करा लहान, शेणी करा दान’’ असा नारा देत शेणी दाण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमांतून यंदा अडीच लाख शेणी संकलित करून महानगरपालिकेच्या स्मशानभूमीस सुपूर्द करण्यात येणार असल्याचे उत्सव समितीचे संस्थापक माजी नगरसेवक शारंगधर देशमुख यांनी सांगितले. वसंतराव देशमुख हायस्कूलच्या सभागृहात मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. गतवर्षी सव्वादोन लाख शेणी पालिकेच्या स्मशानभूमीस देण्यात आल्या होत्या.
यंदाही उपनगरातील नागरिकांनी शेणीदान कराव्यात, असे आवाहन मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे. यावेळी अध्यक्ष चंद्रकांत कांबळे, उपाध्यक्ष सचिन चौगुले, खजानिस आनंदा पाटणकर, सचिव सुधीर राणे, भिकाजी गावकर उपस्थित होते.