गडहिंग्लज : केंद्राच्या ‘एफआरपी’ कायद्यात कोणत्याही राज्याला बदल करता येत नाही. प्रसंगी केंद्राने वटहुकुमाद्वारे त्यात दुरुस्ती केली तरी त्यास लोकसभा व राज्यसभेची मंजुरी घ्यावी लागेल. भूमी अधिग्रहणाचा अनुभव लक्षात घेता केंद्र सरकारही शेतकऱ्यांच्या विरोधात जाण्याचे धाडस करणार नाही. त्यामुळे सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘एफआरपी’ कायद्याचा आधी गृहपाठ करावा आणि मगच बोलावे, असा सल्ला खासदार राजू शेट्टी यांनी दिला.येथील बॅ. नाथ पै विद्यालयाच्या मैदानावर एकरकमी ‘एफआरपी’च्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे आयोजित सभेत ते बोलत होते. त्यांच्यासह जिल्हाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील, प्रदेश सचिव राजेंद्र गड्यान्नावर, आदींनी आमदार हसन मुश्रीफ, आमदार जयंत पाटील व खासदार शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली.शेट्टी म्हणाले, ‘एफआरपी’च्या तुकड्याला शेतकऱ्यांचा पाठिंबा आहे, असे दाखविण्यासाठी काही कारखान्यांनी वार्षिक सभेत ठराव केले आहेत. त्या बेकायदेशीर ठरावांना कसलाही अर्थ नाही. त्यामुळे हक्काच्या ‘एफआरपी’साठी ‘स्वाभिमानी’च्या अर्जावर सह्या करा आणि मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हा.यावेळी गडहिंग्लज तालुकाध्यक्ष दिलीप बेळगुद्री, आजरा तालुकाध्यक्ष तानाजी देसाई, दीपक पाटील, नवनीत पाटील यांचीही भाषणे झाली. यावेळी धनाजी पाटील, अॅड. अरुण शिंत्रे, संभाजी केसरकर, बाळाराम फडके, विनायक देसाई, सखाराम केसरकर, आदींसह कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अॅड. आप्पासाहेब जाधव यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)
आधी गृहपाठ करा, मगच बोला!
By admin | Published: October 13, 2015 10:45 PM