कोल्हापूर : काँग्रेसचेकोल्हापूर उत्तरचे आमदार चंद्रकांत जाधव (अण्णा) यांचे गुरुवारी, (२ डिसेंबर) रोजी पहाटे निधन झाले. हैदराबादमध्ये खासगी रुग्णालयात उपचारादरम्यानच त्यांचा प्राणज्योत मालावली. स्वर्गीय आमदार जाधव यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी आज काँग्रेस कमिटीमध्ये शोक सभेचे आयोजन करण्यात आले होते. या शोकसभेत उपस्थित नेते मंडळीनी आगामी पोटनिवडणुकीत जाधव यांच्या जागेवर त्यांच्या पत्नीची बिनविरोध निवड करण्यात यावी अशा भावना व्यक्त केल्या.दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली व्हायची असेल आणि त्यांच्या स्वप्नातील कोल्हापूरचा विकास करायचा असेल तर त्यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना आगामी पोटनिवडणुकीत तिकीट द्यावे. ही निवड बिनविरोध करण्यासाठी भाजपाने मन मोठे करून पुढाकार घ्यावा असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. दरम्यान त्यांनी पोटनिवडणुकीत कोणाला तिकीट द्यायचे आणि कोणाला नाही हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न असल्याचेही स्पष्ट केले.पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, स्वर्गीय आमदार जाधव यांच्या मनातील विकासासाठी आपण प्रयत्नशील राहूया. जाधव यांच्या अकाली निधनाने त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. यातून त्यांना सावरण्याचा प्रयत्न करूया, असे ते म्हणाले. यावेळी खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आवाडे, आमदार पी. एन. पाटील, राजूबाबा आवळे, माजी आमदार सुजित मिंचेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.अलीकडेच भाजपने विधानपरिषदेतील काही जागा बिनविरोध केल्या आहेत. त्यामुळे या पोटनिवडणुकीबाबत भाजप काय निर्णय घेणार हे पाहावे लागणार आहे.
जयश्री जाधवांना पोटनिवडणुकीत बिनविरोध करा, स्वर्गीय आमदार जाधवांच्या शोकसभेत भावना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2021 2:35 PM