कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील पूरबाधितांच्या पुनर्वसनाची सुरुवात भेंडवडे गावापासून करूया. पुरापासून सुरक्षित राहण्यासाठी शासनाच्या जागेवर कायमस्वरूपी स्थलांतरित होण्यासाठी इच्छुक नागरिकांच्या नावांची यादी तयार करण्याच्या सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी शनिवारी महसूल व ग्रामविकास विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या.
मंत्री पाटील यांनी शनिवारी हातकणंगले तालुक्यातील बुवाचे वठार, खोची, भेंडवडे या भागांत पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली; तसेच या गावांचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी व ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी आमदार राजूबाबा आवळे, सरपंच, उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात, तहसीलदार प्रदीप उबाळे, गटविकास अधिकारी शबाना मोकाशी उपस्थित होत्या.
यावेळी गावकऱ्यांनी भेंडवडे गावाला दरवर्षी पूर परिस्थितीला सामोरे जावे लागते, यावर कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी केली. यावर मंत्री पाटील यांनी वारंवार ग्रामस्थांना पूर परिस्थितीला सामोरे जावे लागू नये यासाठी कायमस्वरूपी स्थलांतरित होण्याची तयारी असलेल्या नागरिकांच्या नावांची यादी बनवावी, जिल्ह्यात पूरबाधितांच्या पुनर्वसनाची सुरुवात भेंडवडेपासून करू. येथील इच्छुक नागरिकांचे पहिल्या टप्प्यात पुनर्वसन करू, अशी ग्वाही दिली. यावेळी त्यांनी नागरिकांना रमाई आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळू शकेल का, यावर चर्चा केली.
---
फोटो नं ३१०७२०२१-कोल-भेंडवडे
ओळ : पालकमंत्री सतेज पाटील यंनी शनिवारी भेंडवडे (ता. हातकणंगले) येथील पूरग्रस्तांशी संवाद साधला.
---
--