कोल्हापूर : शाहूवाडी, पन्हाळा, शिराळा तालुक्यांत बहुतांशी वनक्षेत्रात दुर्मीळ औषधी वनस्पती मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. यासाठी आयुष मंत्रालयामार्फत संशोधन व प्रक्रिया केंद्र स्थापन करावे, अशी मागणी खासदार धैर्यशील माने यांनी लोकसभेत केली.हा भाग युनेस्कोचा जागतिक वारसा असणाऱ्या पश्चिम घाटमाथ्याच्या अंतर्गत येतो. त्याचप्रमाणे जगातील पहिल्या आठ जैविक विविधता हॉटस्पॉट साईटमध्येही याचा समावेश आहे. या भागात कर्करोगाच्या उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या नरक्या, मधुमेहाच्या उपचारात वापरण्यात येणारे सप्तरंगी, डेंग्यूपासून बचाव करण्यासाठी गिलोही, आयुर्वेदातील औषधांची राणी मानली जाणारी शतावरी, शिकाई, गुळवेल, रानहळद आदी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत.
या सगळ्यांचा अनेक वर्षांपासून पारंपरिक पद्धतीने वापर केला जातो. या वनस्पतींची गुणवत्ता व उपलब्धता पाहून केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयामार्फत संशोधन व विकास केंद्राची स्थापना करावी. औषध निर्मितीस प्रोत्साहित करून राष्ट्रीय आयुष मिशन अंतर्गत आयुर्वेद रुग्णालय सुरू करावे. अशी आग्रही मागणी खासदार माने यांनी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली.