कोल्हापूर : सरकारी रुग्णालयात चांगली वैद्यकीय सेवा, स्वच्छता देऊन मध्यमवर्गीयांनाही सहारा देणारे हॉस्पिटल निर्माण करण्याचा प्रयत्न असेल, असा विश्वास वैद्यकीय शिक्षण सल्लागार सहसंचालकडॉ. तात्याराव लहाणे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
कोल्हापुरात राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सीपीआर हॉस्पिटल, शेंडा पार्क येथील प्रशिक्षण केंद्राची पाहणी डॉ. लहाणे यांनी गुरुवारी केली. त्याप्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते.
कोल्हापूर व पुणे या दोन ठिकाणी ट्रामाकेअर युनिट नव्याने सुरू केल्याने तेथे अपुरे मनुष्यबळ आहे. तेथे प्रत्येकी ४८ जागा भरण्याचा प्रस्ताव तयार केला असून, तो वैद्यकीय शिक्षण विभागाकडून मंजूर करून घेऊ, असे डॉ. लहाणे यांनी दिली.
‘सीपीआर’मध्ये उपचारपूरक यंत्रसामग्री आहे; पण त्यातील अनेक यंत्रसामग्री बंद पडते, काही ठिकाणी तिची अपुरी व्यवस्था आहे, असे सांगून डॉ. लहाणे म्हणाले, सीपीआर रुग्णालयातील एमआरआय, आयसीयू, सीटी स्कॅन मशीनच्या अवस्थेची पाहणी केली. आवश्यक तेथे नवीन यंत्रणा बसविण्यात येईल, तर काही मशीनची दुरुस्ती-देखभाल करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे.
वैद्यकीय महाविद्यालयातील रिक्त पदे, रुग्णालयातील उपचाराच्या यंत्रसामग्रीबाबत प्रत्येक विभागाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह प्रभारी वैद्यकीय अधिष्ठाता राघोजी थोरात, जिल्हा शल्यचिकित्सक एल. एस. पाटील, वैद्यकीय अधीक्षक शिशिर मिरगुंडे, आदी उपस्थित होते. त्यांनी विभागप्रमुखांच्या बैठका घेऊन चर्चा केली.