कोल्हापूर : वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या कोल्हापूर शहरातील युवक-युवतींना ९१७५११९५९९ या मोबाईल क्रमांकावर एक मिस्ड कॉल दिल्यानंतर अथवा पूर्ण नाव आणि पत्ता व्हॉट्सअॅप केल्यानंतर त्यांचे नाव मतदारयादीत नोंदवता येणार आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
ज्या युवकांनी मतदार नोंदणी केलेली नाही, त्यांनी या अभियानात भाग घेऊन स्वतःचे नाव मतदार म्हणून नोंद करणे आवश्यक आहे. त्यासाठी ही मिस्ड कॉल, व्हॉट्स अॅप सुविधा सुरू करण्यात आली आहे. मिस्ड कॉल अथवा पूर्ण नाव आणि पत्ता व्हॉट्सअॅप आल्यानंतर पालकमंत्री पाटील यांच्या कार्यालयातील लोक संबंधितांच्या घरी येऊन मतदार नोंदणीसाठी संपूर्ण सहकार्य करणार आहेत. या नोंदणीसाठी येणाऱ्या प्रतिनिधीला आपली माहिती, घरातील मतदार असलेल्या व्यक्तीचे निवडणूक ओळखपत्र, आपला फोटो, रहिवास दाखला आणि वयाचा दाखला स्कॅन करण्यासाठी देऊन सहकार्य करावे. या उपक्रमाचा फायदा शहरातील जास्तीत जास्त युवक, युवतींनी घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री पाटील यांनी केले आहे.
चौकट
रहिवास, वयाचा पुरावा आवश्यक
वयाच्या पुराव्यासाठी जन्मदाखला, मार्कशीट, पासपोर्ट, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसेन्स, आधार कार्ड यांपैकी एक आणि रहिवासाचा पुरावा म्हणून पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसेन्स, बँक, किसान, पोस्ट ऑफिस करंट पासबुक, रेशन कार्ड, इन्कम टॅक्स असेसमेंट, भाडेकरार पत्र, पाणी, टेलिफोन, लाईट बिल, गॅस कनेक्शन बिल, पोस्टामार्फत आलेले पोस्ट, पत्र, मेल यांपैकी एक दाखला आवश्यक आहे.