रिंगणे बंधूंचा उपक्रम : गडहिंग्लजमध्ये कोविड रुग्ण व नातेवाईकांना मोफत जेवणाची सोय
राम मगदूम।
गडहिंग्लज
दोन ओळीचा संदेश त्यांनी व्हॉट्सअॅपवर टाकला आणि कामाला सुरुवात केली. अवघ्या चार दिवसात १०० कोरोना रुग्णांसह नातेवाईकांच्या जेवणाची मोफत सोय झाली. तुम्ही फक्त एक फोन करा, आम्ही तुम्हाला जागेवर जेवण पोहोच करतो, असा कृतिशील दिलासा देणाऱ्या रिंगणे बंधूंच्या 'वारसा माणुसकीचा' या उपक्रमाचे जिल्ह्यात विशेष कौतुक होत आहे.
उपजिल्हा रुग्णालयासह गडहिंग्लज शहरातील खासगी दवाखान्यात गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यातील शेकडो कोविड रुग्ण उपचार घेत आहेत. परंतु, लॉकडाऊनमुळे हॉटेल, खानावळी बंद आणि वाहतुकीची व्यवस्था ठप्प असल्याने रुग्ण आणि नातेवाईकांच्या जेवणाचे वांदे झाले आहेत. म्हणूनच मिलिंद व संदीप रिंगणे या दिलदार भावांनी हा उपक्रम सुरू केला आहे.
राहत्या घरानजीकच्या शेडमध्येच त्यांनी 'खास किचन' सुरू केले आहे. त्यासाठी स्वयपांकीसह तीन महिलांना कामाला घेतले आहे. त्यांच्या आई अंजना, मिलिंदची पत्नी स्मिता व संदीपची पत्नी अॅड. पूनम, चुलत भाऊ शिवानंद आणि त्यांच्या टायर विक्रीच्या दुकानातील कामगारदेखील या मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभागी झाले आहेत.
स्वराज्य एचपी गॅसचे अभिजीत विश्वासराव देसाई यांनी या उपक्रमासाठी गॅस सिलिंडर तर सिद्धू नेवडे यांनी भाजीपाला व मीठ मोफत उपलब्ध केले आहे. रेशन दुकानदार संघटनेतर्फे ५० किलो डाळीची मदत केली आहे. अशी अनेक मंडळी मदतीसाठी पुढे येत आहेत.
----------------------
*
यातून सुचली कल्पना
पहिल्या लाटेत पॉझिटिव्ह आल्यामुळे संदीप यांनी कोल्हापूरातील एका खासगी दवाखान्यात उपचार घेतले. त्यावेळी रुग्ण आणि सेवेसाठी थांबलेल्या नातेवाईकांचे झालेले हाल त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिले. त्याचवेळी कोरोनाग्रस्तांसाठी काहीतरी केले पाहिजे, असे त्यांच्या मनी ठसले. दिवंगत वडील प्राचार्य आण्णाराव यांच्या संस्कारातूनच त्यांनी हा उपक्रम सुरू केला आहे.
----------------------------------------
* जेवणाची मागणी नोंदविण्यासाठी मिलिंद (९४२३२७३७६५), संदीप (९८२२३५२९२७), पूनम (८७९३३९३३३३) या मोबाईलवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दोन चपाती, उसळ, भाजी, वरण, भात, कांदा, लिंबू व लोणचे असे जेवण प्रत्येक रुग्णाला पोहोच केले जाते.
----------------------------------------
फोटो ओळी : गडहिंग्लज येथे कोरोनाग्रस्तांसाठी रिंगणे बंधूंनी सुरू केलेल्या अन्नदान उपक्रमाचे नियोजन त्यांच्या आई अंजना यांच्याकडे असून सूना स्मिता व पूनम यादेखील स्वयंपाकासाठी दररोज झटत आहेत. दुसऱ्या छायाचित्रात रुग्णांच्या नातेवाईकांना जेवण देताना संदीप रिंगणे.
क्रमांक : १६०५२०२१-गड-१२/१३