कोल्हापुर : मराठा समाजाला आरक्षण देण्यास सरकार टाळाटाळ करत असून सत्ताधाऱ्यांनी समाजाला नुसते झुलवत ठेवले आहे. आरक्षणासंबंधी बैठक घेण्याचा शब्द देऊनही तो पाळला जात नाही. सरकारने मनोज जरांगे-पाटील यांना ४० दिवसांची मुदत दिली आहे. त्या मुदतीत आरक्षण द्या, अन्यथा २४ ऑक्टोबरनंतर समाजाचा रोष सरकारला महागात पडेल, असा इशारा कोल्हापुरातील सकल मराठा समाजाने मंगळवारी दिला. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार उदासीन असल्याने सकल मराठा समाजाने येथील मिरजकर तिकटी परिसरात जेलभरो आंदोलन करत सरकारचा निषेध केला. 'एक मराठा, लाख मराठा', 'आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं', 'कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही' 'या सरकारचं करायचं काय' अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, बाबा इंदूलकर, आर.के.पोवार, आदिल फरास, दिलीप देसाई, बाबा पार्टे उपस्थित होते. दिलीप देसाई म्हणाले, मराठा समाजाचे आंदोलन चिरडण्याचे काम सरकार करत आहे. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकात पाटील यांना कोणतेही अधिकार दिले नाहीत. मुख्यमंत्र्यांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी चंद्रकांत पाटील यांचा राजीनामा घ्यावा, नसेल तर त्यांना पूर्णत:अधिकार द्यावेत. जरांगे-पाटील यांच्या पाठीशी सकल मराठा समाज ठामपणे उभा आहे. त्यांना दिलेल्या मुदतीत आरक्षणाचा शब्द पाळावा. राष्ट्रवादीचे (शरद पवार गट)शहराध्यक्ष आर.के.पोवार म्हणाले, सरकारला आरक्षण द्यायचे नसल्यानेच ते चालढकल करत आहेत. सरकार सोंग करत असून त्यांना जागे करण्यासाठी जेलभरो आंदोलन केले आहे. राष्ट्रवादी (अजित पवार गट) आदिल फरास म्हणाले, सरकार कुणाचेही असो, मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आम्ही त्यांच्याविरोधात संघर्ष करू. बाबा पार्टे म्हणाले, जरांगे-पाटील यांना दिलेला शब्द पाळावा, अन्यथा २४ ऑक्टोबरनंतर समाजाचा रोष सरकारला महागात पडेल. यावेळी अंजली जाधव, सुनिता पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अटक करून नंतर सोडून दिले. या आंदोलनात चंद्रकांत पाटील, महादेव पाटील, माई वाडेकर, अमरसिंह निंबाळकर, वैशाली महाडिक, अविनाश दिंडे यांनी सहभाग घेतला.१४ ला शाहू स्मारकमध्ये बैठकमराठा समाजाच्या आरक्षणासंबंधी आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी १४ ऑक्टोबरला दुपारी बारा वाजता शाहू स्मारक भवनात बैठक आयोजित करण्यात आल्याचे शिवसेनेचे विजय देवणे यांनी सांगितले.
Maratha Reservation: मुदतीत आरक्षण द्या, अन्यथा २४ ऑक्टोबरनंतर महागात पडेल; कोल्हापुरातील सकल मराठा समाजाचा इशारा
By पोपट केशव पवार | Published: October 10, 2023 1:25 PM