उत्तूर : पुनर्वसनाचे काम पूर्ण न करताच पोलीस बंदोबस्तात घळभरणीचे काम सुरू करून धरणग्रस्तांना देशोधडीला लावण्याचे काम शासन आणि प्रशासनाने केले आहे. धरणग्रस्तांच्या प्रश्नांबाबत योग्य निर्णय, अन्यथा धरणाचे काम बंद करण्यात येईल, असा इशारा कॉ. संपत देसाई यांनी आर्दाळ (ता. आजरा) येथे धरणग्रस्तांच्या बैठकीत दिला.
कॉ. संपत देसाई म्हणाले, धरणग्रस्तांनी मागण्यासाठी आवाज उठवू नये म्हणून पोलिसांचा बंदोबस्त ठेवला आहे. आमचा धरणाला किंवा घळभरणीला विरोध नाही. विरोध कामाच्या पद्धतीला आहे. आधी पुनर्वसन मग धरण या कायद्याप्रमाणे पुनर्वसनाचे काम पूर्ण करूनच घळभरणी व्हायला हवी होती. पण, येथे धरणग्रस्तांना विचारात न घेता बेकायदा घळभरणी सुरू आहे.
कॉ. संजय तर्डेकर म्हणाले, आंबेओहळ धरणग्रस्तांनी घाबरून जायची गरज नाही. आम्ही तालुक्यातील सर्व प्रकल्पग्रस्त तुमच्यासोबत राहू. तुम्ही नेटाने आणि एकजुटीने लढाईची तयारी करावी.
शिवाजी गुरव यांनी प्रास्ताविक केले. बजरंग पुंडपळ यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी शिवाजी येजरे, सचिन पावले, संजय खाडे, महादेव खाडे, राजू देशपांडे, मधू पोटे यांच्यासह प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.
---------------------
* काम बंद पाडण्याचा इशारा
जिल्हाधिकारी यांनी पुनर्वसनाबाबत १७ तारखेपर्यंत बैठक न घेतल्यास १८ तारखेपासून काम बंद पाडण्यात येणार आहे. कायदा मोडून काम होणार असेल तर कायदा हवाच कशाला? असा प्रश्नही धरणग्रस्तांनी उपस्थित केला.
---------------------
* दलाल शोधून कारवाई करा आंबेओहळ प्रकल्पग्रस्तांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करून अधिकाऱ्यांचे दलाल बनले आहेत. अनेक प्रश्न अर्धवट आहेत. पाणीसाठ्यानंतर पुनर्वसनाचे भिजत घोंगडे कायम राहणार आहे. प्रकल्पातील दलाल चुकीची माहिती अधिकारी व लोकप्रतिनिधीनींना देत आहेत. त्यांच्यावर कारवाई करा.
- शंकर पावले, धरणग्रस्त.
---------------------
फोटो ओळी : आर्दाळ (ता. आजरा) येथे धरणग्रस्तांच्या बैठकीत कॉ. संपत देसाई यांनी मार्गदर्शन केले.
क्रमांक : ०८०३२०२१-गड-१०