कोल्हापूर : दुकाने सुरू करण्याची वेळ सकाळी ९ ते दुपारी १ अशी करण्याची मागणी कोल्हापूर चेंबर्स ऑफ कॉमर्सच्यावतीने बुधवारी करण्यात आली. अध्यक्ष संजय शेटे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने बुधवारी संध्याकाळी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची भेट घेऊन त्यांना मागणीचे निवेदन दिले.
राज्यामध्ये ब्रेक द चेन अंतर्गत सकाळी ७ ते ११ या कालावधीत दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. कोल्हापूर शहरातील दुकानांमधील कामगार परगावचे असल्याने त्यांच्या येण्याची वेळ सकाळी ९ नंतरची आहे. बँकेची वेळ सकाळी ११ नंतर असल्याने बँकेचे व्यवहार करता येत नाहीत. कोल्हापूर ही घाऊक बाजारपेठ असल्याने येथून मालाचा पुरवठा कोल्हापूर जिल्हा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा व इतर ठिकाणी होतो. याठिकाणी माल पोहोचण्यास अडचणी निर्माण होत आहेत. कोल्हापूर शहरातील ट्रान्स्पोर्ट व्यवसायदेखील सकाळी १० नंतर चालू होत असल्याने अत्यावश्यक व जीवनावश्यक मालाचा पुरवठा इतर ठिकाणी करणे शक्य होत नाही. कोल्हापूर शहरातील सर्व ट्रान्स्पोर्ट व्यावसायिकांची वितरणाची वेळ ही मर्यादित असून याठिकाणी गर्दी वाढून त्यांनाही समस्या निर्माण होऊ शकतात असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. यावेळी चेंबरचे माजी अध्यक्ष व किराणा भुसार व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप कापडिया, ग्रेन मर्चंटस् असोसिएशनचे माजी अध्यक्ष वैभव सावर्डेकर, कन्झ्युमर प्रोडक्टस् डिस्ट्रिब्युशन असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत शिंदे, चेंबरचे संचालक राहुल नष्टे व अजित कोठारी उपस्थित होते.
२१०४२०२१ कोल चेंबर्स ऑफ कॉमर्स
कोल्हापुरात दुकानांसाठी वेळ वाढवून द्यावी, अशी मागणी चेंबर्स ऑफ कॉमर्सतर्फे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे बुधवारी करण्यात आली.