कोल्हापूर : राज्यातील ऊसतोडणी मजूर व वाहतूकदारांचा पाच वर्षे प्रलंबित असणारा त्रिपक्षीय सामंजस्य करार करा व आगामी हंगामात मजुरीवाढ करावी, या मागणीसाठी मंगळवारी महाराष्ट्र राज्य ऊसतोडणी व वाहतूक कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.यावेळी संघटनेचे राज्य सरचिटणीस प्रा. सुभाष जाधव म्हणाले, मागील करारावेळी कराराची मुदत तीनऐवजी पाच वर्षे करून आणि कराराचे एक वर्ष सोडून दिल्यामुळे या कामगारांचे नुकसान झाले. कामगारांसाठी कल्याणकारी महामंडळाची नुसतीच घोषणा झाली.
अद्याप कामकाज सुरू नसल्याने कामगारांना सुविधा मिळत नाहीत. तरी त्रिपक्षीय करारासह महामंडळाचे कामकाज सुरू केले तरच कोयत्याला हात घालू. यावेळी प्रा. आबासाहेब चौगले, आनंदा डाफळे, दिनकर आदमापुरे, पांडुरंग मगदूम, विठ्ठल कांबळे, नामदेव जगताप, राजाराम गौड, सदाशिव पाटील, आदी उपस्थित होते.