कोल्हापूर : ज्येष्ठ तसेच व्याधीग्रस्त नागरिकांचे शंभर टक्के लसीकरण होण्यासाठी ग्रामसेवक, पोलीस पाटील, शिक्षक, आशा, कोतवाल यांना नोंदणीचे प्रशिक्षण द्या, लोकांचे प्रबोधन, जास्तीत-जास्त नोंदणी करणे याबाबत गावनिहाय आराखडा तयार करा, असे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी बुधवारी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी छत्रपती शाहू सभागृहात तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेऊन त्यांनी वरील सूचना केल्या.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, पोलीस उपअधीक्षक सुनीता नाशिककर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल माळी, वैद्यकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता एस. एस. मोरे, डॉ. फारुख देसाई उपस्थित होते.जिल्हाधिकारी म्हणाले, मृत्युदर रोखण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे असून, तालुक्यातील मोठ्या खासगी रुग्णालयांचे तालुका आरोग्य अधिकारी यांनी प्रस्ताव पाठवावेत. प्रत्येक गावातील ज्येष्ठ आणि व्याधीग्रस्त नागरिकांची यादी घ्या. गावनिहाय नोंदणी आणि लसीकरणाचे नियोजन करा.
त्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांना गावे वाटून द्या, गावांमध्ये जनजागृती करा, नोंदणी करण्यासाठी शिक्षक, आशा सेविका यांची मदत घ्या. पहिल्या टप्प्यात गावातील स्थानिक प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत सदस्य, प्रतिष्ठित नागरिक यांचे प्रथम लसीकरण करून घ्या, त्यांचा अनुभव इतरांसाठी प्रोत्साहन ठरेल.मुख्य कार्यकारी अधिकारी चव्हाण म्हणाले, शंभर टक्के लसीकरण होण्यासाठी दवंडी, व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून तसेच तरुण मंडळांच्या माध्यमातून गावागावांत जनजागृती करा. ज्या अधिकारी, कर्मचारी यांचे लसीकरण राहिले असेल, त्यांनी स्वत: पुढाकार घेऊन प्रथम आपले लसीकरण करून घ्यावे. आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनीही महापालिकेतर्फे करण्यात आलेले नियोजन सांगितले. यावेळी कोविन ॲपवर नोंदणी कशी करायची याबाबत प्रात्यक्षिक देण्यात आले.बैठकीस प्रांताधिकारी वैभव नावडकर, अमित माळी, डॉ. संपत खिलारी, विजया पांगारकर, डॉ. विकास खरात, रामहरी भोसले, महिला व बाल विकासचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ, कृषी विकास अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, डॉ. उषादेवी कुंभार उपस्थित होत्या.