लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर : शाहूवाडी तालुक्यात संस्थान कालीन असलेल्या एकमेव मलकापूर नगरपालिका निवडणुकीचे वेध शहरवासीयांना लागून राहिले आहेत. पालिकेच्या राजकीय पटलावर जनसुराज्य, भाजप व दलित महासंघ युतीची सत्ता आहे. आगामी निवडणुकीचे बिगुल वाजले असले तरी जनसुराज्य, भाजप व शिवसेना, राष्ट्रवादी अशा चार पक्षात निवडणूक होणार आहे. संधी न मिळालेल्या नाराज मंडळी तिसरी आघाडी घडवून आणू शकतात. मात्र नगराध्यक्ष आरक्षण व प्रभाग रचना यानंतर खरे चित्र स्पष्ट होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी मतदारांची चाचपणी सुरू केली आहे.
गतवेळच्या निवडणुकीत जनसुराज्य -भाजप युती व सेना, राष्ट्रवादी आघाडीच्या वतीने लढली गेली होती. यामध्ये नगराध्यक्षपदासह ११ जागा जिंकून आमदार विनय कोरे, यांच्या जनसुराज्य, भाजप युतीने पालिकेवर आपला झेंडा फडकविला होता. तर शिवसेना पाच ‘राष्ट्रवादी तीन जागांवर समाधान मानावे लागले होते. जनसुराज्य पक्षाचे आघाडी प्रमुख सर्जेराव पाटील पेरीडकर, भाजपचे राजू प्रभावळकर, नगराध्यक्ष अमोल केसरकर यांना पालिकेत सत्तेसाठी प्रयत्न करावा लागणार आहे. विरोधी सेना, राष्ट्रवादीला पराभवाचा वचपा काढण्यासाठी सेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील, राष्ट्रवादीचे मानसिंगराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आघाडी प्रमुख प्रकाश पाटील, गटनेत्या माया पाटील याचेसह अन्य शिलेदारांना प्रयत्न करावे लागणार आहेत. सध्या जनसुराज्य व भाजप युतीत उपनगराध्यक्ष पदावरून धुसफुस चालू असली तरी ऐनवेळी आमदार विनय कोरे , माजी मंत्री चंद्रकांत दादा पाटील, सर्जेराव पाटील यांच्या बैठकीत झालेला निर्णय कार्यकर्त्यांना मान्य करावा लागणार आहे.
० शहराची लोकसंख्या -
५३३९
. शहराचे मतदार
३८००
एकूण प्रभाग
१७
वार्षिक उत्पन्न
१ कोटी १० लाख
उत्पन्नाची साधने
घरफाळा, पाणीपट्टी, बाजारकर, दुकान भाडे, शासकीय अनुदाने
- पाच वर्षातील कामे -
१) शहराला सायफन पद्धतीने पाणीपुरवठा होणाऱ्या पालेश्वर योजनेचे काम अंतिम टप्प्यात
२) शहराच्या मध्यभागी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम प्रगतीपथावर
३) अग्निशामक केंद्राची उभारणी
४) भाजी मार्केट, शॉपिंग सेंटर इमारतीचे काम पूर्ण
५ ) शहरातील अंतर्गत रस्ते पूर्णपणे डांबरीकरण
६ ) कचरा डेपो अद्ययावत