राजाराम कांबळे--मलकापूर नगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. कोणत्याच पक्षाला स्वतंत्रपणे निवडणूक जिंकण्याची खात्री नसल्याने नेत्यांनी आघाडी व युतीची जुळवाजुळव सुरू केली आहे. मात्र, बहुतांश इच्छुकांचे मनसुबे उधळण्याची शक्यता आहे.मलकापूर नगरपालिकेचे नगराध्यक्षपद नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव आहे. जनसुराज्य शक्ती पक्ष-भाजप-काँग्रेस व स्वाभिमानी शेतकरी संघटना विरुद्ध शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व दलित महासंघ यांची युती होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी राजकीय पक्षाच्या नेतेमंडळींनी जुळवाजुळव सुरू केली आहे. सत्ताधाऱ्यांनी विकासकामांच्या जोरावर परत पालिकेत सत्ता आणण्यासाठी मोठी व्यूहरचना आखली आहे, तर विरोधक भ्रष्टाचाराचे बॉम्ब फोडण्याच्या तयारीत आहेत. ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची होणार आहे. पालिका निवडणुकीत जिल्ह्याचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक, विधान परिषदेचे आमदार सतेज पाटील, आमदार सत्यजित पाटील, माजी मंत्री विनय कोरे, जिल्हा बँकेचे संचालक सर्जेराव पाटील-पेरीडकर, मानसिंगराव गायकवाड, खासदार राजू शेट्टी, करणसिंह गायकवाड, आदी दिग्गज मंडळी सहभागी होऊन आपल्या पॅनेलसाठी प्रयत्न करणार असल्याचे संकेत मिळत आहेत.नगरपालिकांच्या निवडणुका सन २०११ च्या जनगणनेनुसार होत असल्याने ५५०० लोकसंख्येच्या मलकापूर नगरपालिका सभागृहातील नगरसेवकांची संख्या एका सदस्याने वाढवून १८ झाली आहे. शासनाने घोषित केल्याप्रमाणे प्रभाग रचनेचे आठ प्रभाग आहेत. सध्या पालिकेवर राष्ट्रवादी- जनसुराज्य शक्ती पक्षाची सत्ता आहे. होऊ घातलेल्या निवडणुकीत सेनेचे आमदार सत्यजित पाटील यांनी पक्षाच्या अधिकृत चिन्हावर निवडणूक लढण्याचे आदेश दिले होते. मात्र, कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेण्यासाठी आमदारांवर दबाव वाढला आहे. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे इच्छुकांची मोठी संख्या असल्याने व नगराध्यक्षपद कळीचा मुद्दा ठरत असल्यामुळे गेले आठ दिवस बैठका सुरू आहेत. मात्र, शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसची युती होण्याची दाट शक्यता आहे. नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे प्रकाश पाटील व सेनेचे माजी नगराध्यक्ष शामराव कारंडे इच्छुक आहेत. सर्वच उमेदवारांनी सेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवावी, असे सांगितले आहे.जनसुराज्य शक्ती पक्ष, भाजप, काँग्रेस व स्वाभिमानी शेतकरी संघटना अशी आघाडी पालिका निवडणुकीत होणार आहे. जनसुराज्य पक्षाचे जिल्हा बँकेचे संचालक सर्जेराव पाटील-पेरीडकर यांनी भाजप, काँग्रेस व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना बोलावून त्यांची मते जाणून घेऊन आघाडी केली आहे. भाजपचे राज्य परिषद सदस्य राजू प्रभावळकर, दाजी चौगुले, काँग्रेसचे करणसिंह गायकवाड, महादेवराव पाटील यांच्याशी चर्चा करून आघाडीचा निर्णय घेतला आहे. या आघाडीसाठी मंत्री चंद्रकांतदादा पाटील, महादेवराव महाडिक, आमदार सतेज पाटील, आमदार अमल महाडिक, खासदार राजू शेट्टी यांची मदत घेणार असून, नगराध्यक्षपदासाठी महादेवराव महाडिक यांचे खंदे समर्थक माजी उपनगराध्यक्ष अमोल केसरकर यांनी आघाडी घेतली आहे. या आघाडीचे सर्व उमेदवार कमळ चिन्हावर लढण्याची शक्यता आहे. जनतेतून नगराध्यक्ष निवडण्यात येणार असल्याने सध्या अमोल केसरकर, प्रकाश पाटील, शामराव कारंडे इच्छुक आहेत. पंधरा वर्षांनंतर जनतेतून नगराध्यक्ष निवडला जाणार आहे. त्यामुळे सक्षम उमेदवारावरच पक्षाचा भार आहे. आघाड्या कशा होणार यावरच सत्तेची गणिते अवलंबून आहेत.
मलकापुरात आघाडी, युतीची जुळणी सुरू एकटे जिंकण्याची खात्री नाही : इच्छुकांचे मनसुबे धुळीस मिळण्याची शक्यता
By admin | Published: October 27, 2016 12:45 AM