कऱ्हाड : मलकापूर नगरपंचायतीचे रूपांतर नगरपरिषदेत व्हावे यासाठी भाजपचे प्रदेश चिटणीस डॉ. अतुल भोसले आग्रही आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यासाठीची मागणी लावून धरली आहे. मंत्रालय पातळीवर याबाबतच्या हालचाली गतिमान झाल्या असून, लवकरच नगरपंचायतीला नगरपरिषदेचा आकार येईल, अशी चर्चा आहे. त्यामुळे मलकापुरात मुदतपूर्व निवडणुकीची शक्यताही वर्तविली जात आहे. कृष्णा-कोयनेच्या प्रीतिसंगमावर वसलेल्या कऱ्हाडचं उपनगर म्हणून मलकापूरची ओळख निर्माण झाली आहे. खरंतर मलकापूर हा मूळचा कऱ्हाडचाच एक भाग आहे. पण १९६२ मध्ये मलकापूर ही स्वतंत्र ग्रामपंचायत म्हणून आकाराला आली. त्यावेळी ज्ञानदेव कराळे यांनी परिश्रम घेतल्याचे सांगितले जाते. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, औद्योगिक, व्यावसायिकदृष्ट्या कऱ्हाडचे महत्त्व वाढीस लागले आणि कऱ्हाडच्या दोन्ही बाजूंनी नदी असल्याने त्याच्या विस्ताराला मर्यादा पडल्या. साहजिकच याचा परिणाम म्हणून कऱ्हाडची उपनगरे वाढू लागली. त्याला मलकापूर अपवाद नाही. पुणे-बेंगलोर महामार्गाच्या दोन्ही बाजूला मलकापूर वाढू लागले. लोकसंख्या वाढू लागल्याने गावाचा विकास त्याच पद्धतीने अपेक्षित होता. ग्रामपंचायत असल्याने विकासनिधीला मर्यादा पडत होत्या. म्हणून मनोहर शिंदे यांच्या प्रयत्नातून पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मलकापुरात ग्रामपंचायत सदस्य ‘मेहरबान’ झाले. कारण मलकापूरची २००८ मध्ये नगरपंचायत झाली. कऱ्हाडजवळचे महामार्गालगत वसलेले उपनगर म्हणून मलकापूरची वाढ तितक्याच झपाट्याने होत आहे. लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे विकास दर वाढण्यासाठी आता नगरपंचायतीची नगरपरिषद होणे गरजेचे बनले आहे. हीच गरज ओळखून भाजपचे प्रदेश चिटणीस डॉ. अतुल भोसले यांनी मलकापूर नगरपरिषदेची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे काही दिवसांपूर्वीच केली होती. मलकापूर नगरपंचायतीची सन २०११ ची लोकसंख्या २७ हजार इतकी आहे. आता तर त्यापेक्षा जास्त लोकसंख्या झाली आहे. नगरपंचायतीची नगरपरिषद होण्यासाठी जे काही निकष आहेत त्यात मलकापूर बसत आहे. त्या सगळ्याचा पाठपुरावा डॉ. अतुल भोसलेंनी जोरदार चालविला आहे. मंत्रालय पातळीवरही याबाबतच्या हालचाली गतिमान झाल्याचे समजते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी याबाबतचा निर्णय त्वरित घेतल्यास मलकापुरात मुदतपूर्व निवडणूक झाल्यास आश्चर्य वाटायला नको. मलकापूर नगरपंचायतीची गत निवडणूक आॅगस्ट २०१३ मध्ये झाली होती. त्यामुळे पुढील निवडणुकीसाठी अजून सुमारे दीड वर्षाचा अवधी आहे. (प्रतिनिधी)...तर नगरसेवकांची संख्या वाढणारमलकापूर नगरपरिषद झाली तर विकासाच्या अनुषंगाने निधीचे प्रमाण नक्कीच वाढणार आहे. सध्या मलकापूर नगरपंचायतीत १७ नगरसेवकांची संख्या आहे. ती संख्या वॉर्डरचनेत पूर्णपणे बदल होऊन १९ ते २१ संख्यापर्यंत पोहोचू शकते, असे आता सध्या तरी त्याबाबत चार्चा सुरू आहे.मलकापूरला नगरपरिषदेचा दर्जा मिळावा म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे. त्याला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, योग्य त्या कागदपत्रांची पूर्तता करण्याचे काम सुरू आहे. येथील नागरिकांच्या हितासाठी लवकरच मलकापूर नगरपरिषद होईल. - डॉ. अतुल भोसले, प्रदेश चिटणीस, भाजप
मलकापुरात ‘मुदतपूर्व’ची शक्यता !
By admin | Published: April 21, 2017 9:46 PM