मलकापूर : मलकापूर परिसरातील रताळी नवरात्रौत्सव व ईदच्या पार्श्वभूमीवर थेट कोल्हापूरसह, नवी मुंबई (वाशी), मुंबई व पुण्याच्या बाजारपेठेसह गुजरातमध्येही पोहोचली आहेत. रताळीला क्विंटलला दोन ते तीन हजारांपर्यंत दर मिळत आहे, तर घाऊक बाजारातही सुमारे २५ ते ३० रुपये किलो दर मिळत असल्याने शेतकरीही खुशीत आहे. शाहूवाडी तालुक्यात प्रामुख्याने भात व ऊस शेती केली जाते. दहा वर्षांपासून रताळी पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. चालू वर्षी एक महिना पाऊस उशिराने दाखल झाला. त्यामुळे रताळी उत्पादनात मोठी घट जाणवू लागली आहे. मात्र, मुंबई, पुणे, वाशी येथे क्विंटलला सरासरी दोन ते तीन हजार रुपयांपर्यंत दर मिळत आहे. शाहूवाडी तालुक्याच्या पश्चिम भागातील पेरीड, कडवे, निनाई परळे, आळतूर, निळे, करुंगळे, भोसलेवाडी, शाहूवाडी, चनवाड, वाळूर, कासार्डे या परिसरातील शेतकरी रताळी पीक घेताना दिसतात. नवरात्रौत्सवात रताळ्याची मागणी मोठ्या प्रमाणात असते. कोकणातील रत्नागिरी, खेड, चिपळूण, कोल्हापूर, सांगली, पुणे कर्नाटक, वाशी, गुजरात, आदी बाजारपेठांत येथील लाल रंगाची गोड रताळी निर्यात होत असतात. खरीप हंगामातील भाताबरोबर रताळी वेलाची लागवड केली जाते. रेताड मिश्रित मातीत हे पीक चांगले येते. मात्र, यंदा पावसाने एक महिना ओढ दिल्याने रताळी पीक उत्पादनात घट झाली आहे. केवळ तीन महिन्यांचे पीक नवरात्रौत्सवात काढणीस येत असल्याने ऐनवेळी शेतकऱ्यांच्या हाती ताजा पैसा येतो. अलीकडे या नगदी पिकाकडे शेतकरी वळला आहे. मात्र, पारंपरिक पद्धतीने शेतकरी रताळ्याचे उत्पादन घेतो. शासनाच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांना हे पीक उत्पादन आधुनिक पद्धतीने घेण्याचे प्रशिक्षण दिले पाहिजे. त्यावर प्रक्रिया करण्याचे उद्योग उभारले पाहिजेत. (प्रतिनिधी) शेतकऱ्यांना जादा पैसे स्थानिक बाजारपेठेत रताळीचा ३० ते ३५ रुपये किलो, तर घाऊक बाजारात २५ ते ३० रुपये किलो विक्रीचा दर आहे. नवरात्रौत्सव, ईद व टिपरी पौर्णिमा या काळात रताळ्यांना मोठी मागणी असते. पाच वर्षांपूर्वी येथील रताळी स्थानिक व्यापारी, दलाल यांच्यामार्फत निर्यात होत होती. मात्र, अलीकडे शेतकरी स्वत:च्या किंवा भाड्याच्या वाहनातून थेट पुणे, मुंबई, वाशी किंवा गुजरात, कोकण, आदी बाजारपेठेत रताळी विक्रीस नेत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जादा पैसे मिळत आहेत.
मलकापूरची रताळी गुजरातला -नवरात्रौत्सवामुळे मागणी :
By admin | Published: September 25, 2014 11:01 PM