समीर देशपांडे ।कोल्हापूर : कोल्हापुरातील आयुर्वेदाचे डॉक्टर म्हणून अमर आडके यांची ओळख; पण त्यापेक्षाही त्यांची जास्त ओळख आहे ती ‘दुर्गभ्रमंती’ करणारा एक भटक्या म्हणून. देशातील ४५४ हून अधिक किल्ले पालथे घालणाऱ्या डॉ. आडके यांचे ‘सह्याद्रीच्या गिरिशिखरांवरून’ हे पुस्तक ४ जानेवारी २०२० रोजी प्रकाशित होत आहे. त्यानिमित्ताने साधलेला हा संवाद.
प्रश्न- किल्ले फिरण्याची प्रेरणा कुणाकडून मिळाली?उत्तर- अनंत आडके माझे वडील. शेतकरी. त्यांना फिरण्याची खूप आवड होती. त्यांच्यासमवेत मी चिक्कोडी तालुक्यातील सदलगा या माझ्या मूळ गावातून दंडोबाचा डोंगर, नृसिंहवाडी येथे चालत येत असे. त्यांच्याकडून मला दुर्गभ्रमंतीची प्रेरणा मिळाली.
प्रश्न- हे किल्ले फिरताना हेतू काय ठेवला?उत्तर- वडिलांनी महाभारतातील एक श्लोक मला सांगितला होता.चक्षु: पश्यति रूपाणीमनसा न च चक्षुषा ।।जोपर्यंत तुम्ही एखाद्या गोष्टीशी एकरूप होणार नाही, तोपर्यंत तुम्हांला डोळे असले तरी तुम्हांला दिसणार नाही. कान असले तरी ऐकू येणार नाही. तुम्ही त्या-त्या गोष्टीशी एकात्म पावण्याची गरज आहे, असा याचा भावार्थ आहे. मी हेच सूत्र लक्षात ठेवले आणि प्रत्येक किल्ल्याशी तादात्म्य पावत तो किल्ला पाहिला. सुरुवातीला धाडसाने, मग कुतूहलाने भ्रमंती केली. अभ्यास करण्यासाठी आणि आता एका ध्यासाने दुर्गभ्रमंती करत आहे.
प्रश्न- सुरुवात कशी केली?उत्तर- १९८१ ला ठरवून मी पहिल्यांदा राजगड पाहिला. शिवाजी महाराजांच्या प्रभावामुळेच मी तो पाहायला गेलो. त्यानंतर सातत्याने मी दुर्गभ्रमंती करीत गेलो. १९८८ साली मी शिक्षण संपवून कोल्हापुरात वैद्यकीय सेवा सुरू केली. मी एकही रविवार दुर्गभ्रमंती चुकू दिली नाही. बृहन्महाराष्ट्रातील ४५४ किल्ल्यांच्या नोंदी आणि टिपणे माझ्याकडे आहेत.
प्रश्न- पन्हाळा पावनखिंडीची सुरुवात कशी झाली ?उत्तर- १९९३ पासून पन्हाळा पावनखिंड पहिली मोहीम आमच्या ‘मैत्रेय’ संस्थेच्या माध्यमातून सुरू केली. गेली ३७ वर्षे ही मोहीम सुरू आहे. पहिली रात्रमोहीमही सुरू केली. एकदिवसीय आणि दोनदिवसीय मोहिमा आहेत.
- दुर्गभ्रमंतीचा वाटाड्या
केवळ किल्ल्यांची माहिती न देता तुम्ही हे पुस्तक वाचताना त्या किल्ल्यावर फिरत असल्याचा भास तुम्हांला झाला पाहिजे, अशा पद्धतीने हे लेखन केले आहे. किल्ल्यांबरोबरच घाटमाथा ते कोकणाकडे जाणाऱ्या ४९ घाटवाटांचीही माहिती यामध्ये आहे. कोकण, घाटमाथ्यावरची मंडळी याच घाटरस्त्यांच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे ये-जा करीत होती. त्यामुळे संस्कृतीची देवाणघेवाणही होत असे. या घाटवाटा सांस्कृतिक सेतू आहेत. त्यांचेही दर्शन या गं्रथामध्ये होते.
- हे सर्व नव्या पिढीसाठी
सकस पिढ्या तयार व्हाव्यात यासाठीच हा सगळा प्रपंच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स'ाद्रीचा उत्तम उपयोग करून घेऊन साधनांची कमतरता असताना स्वराज्याचा खेळ मांडला आणि तो यशस्वीही केला. महाराष्ट्र किल्ल्यांच्या माध्यमातून सुरक्षित केला. हे सगळं नव्या पिढीनं डोळसपणे पाहावं, वाचावं आणि यातून सकस अशी ही नवी पिढी तयार व्हावी. तीच उद्याच्या भारताचे आशास्थान आहे. एवढाच हेतू या सर्व धडपडीमागे आहे.