कोल्हापूर : महानगरपालिका निवडणुकीत प्रत्येक राजकीय पक्षाने वेगवेगळ्या पध्दतीने तयारी सुरू केली आहे. कोणता राजकीय पक्ष कोणाच्या नेतृत्वाखाली लढणार, हेही जवळपास स्पष्ट झाले आहे. काॅंग्रेसमधील पालकमंत्री सतेज पाटील यांच्या एकहाती नेतृत्वाला आता माजी आमदार मालोजीराजे यांचे पाठबळ मिळणार आहे.
महानगरपालिका निवडणुकीच्या माध्यमातून मालोजीराजे यांनी पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय व्हावे, अशी त्यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांची इच्छा होती. निवडणुकीचे आरक्षण जाहीर झाले, त्याच दिवसापासून त्यांचे कार्यकर्ते ‘न्यू पॅलेस’वर त्यांना भेटून विनंती करत होते. चार, पाच दिवस चर्चा, सल्लामसलत केल्यानंतर कार्यकर्त्यांच्या विनंतीनुसार आपल्या गटाच्या कार्यकर्त्यांना पाठबळ द्यावे, असा निर्णय या गटाने घेतला.
महानगरपालिकेच्या राजकारणात मालोजीराजे २००० ते २०१० अशी सलग दहा वर्षे सक्रिय होते. त्यांना मानणारा तेरा-चौदा नगरसेवकांचा गट होता. त्यांच्या गटातील नगरसेवकांना उपमहापौर, परिवहन सभापती यासह काही महत्त्वाच्या समितींचे सदस्य होण्याचा मान मिळाला होता. त्यांच्या गटाचे अनेकजण विविध प्रभागात निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. मालोजीराजेंचे शहराच्या सर्वच भागात कार्यकर्ते आहेत. त्यामुळे राजकारणात सक्रिय झाले, तर नक्की आपल्याला फायदा होऊ शकतो, अशी कार्यकर्त्यांची धारणा आहे.
२००९ च्या विधानसभा निवडणुकीत मालोजीराजे यांचा पराभव झाला, तसे ते शहरातील राजकारणापासून दूर गेले. परंतु काॅंग्रेसपासून फारकत घेतलेली नव्हती. आजही ते काॅंग्रेसशीच बांधिल आहेत. पुण्यातील शिक्षण संस्थेचा मोठा व्याप त्यांनी यशस्वीपणे सांभाळला असून, गेल्या दहा वर्षांत तेथील सर्व सूत्रे त्यांनी हाती घेतली आहेत. त्यामुळेच त्यांना आता काहीशी मोकळीक असल्याने त्यांनी त्यांच्या हिताची कोणतीही निवडणूक नसताना स्थानिक राजकारणात लक्ष घालण्याचे ठरविले आहे.
- पालकमंत्री पाटील यांच्याशी चर्चा -
निवडणुकीच्या अनुषंगाने पालकमंत्री सतेज पाटील व मालोजीराजे यांच्यात चर्चा झाली असल्याचे सांगण्यात येते. महापालिकेत सर्वाधिक नगरसेवक निवडून आणण्याच्या पाटील यांच्या प्रयत्नांना मालोजीराजे यांच्या सक्रिय होण्याने बळ मिळणार आहे.