विश्वास पाटीलकोल्हापूर : करवीर तालुका पंचायत समिती कर्मचारी सहकारी पतसंस्थेत कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या लक्ष्मीपुरी शाखेचा बनावट शिक्का तयार करून संस्थेचे व्यवस्थापक पांडुरंग आण्णाप्पा परिट (रा. कुरुकली, ता. करवीर) यांनी तब्बल १५ कोटी ४४ लाख ३३ हजार १७२ रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे लेखापरीक्षणात स्पष्ट झाले. संस्थेचे प्रमाणित लेखापरिक्षक एन.एन.चौगुले यांनी त्यासंबंधीचा अहवाल जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे यांना दिला. त्यांनी याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे पत्र जिल्हा विशेष लेखापरीक्षक कार्यालयास सोमवारी दिले.एखादी संस्था पूर्णच मोडून खाणे या वाक्याचा शब्दश: प्रत्यय या संस्थेच्या गैरव्यवहारास लागू पडला आहे. व्यवस्थापक परिट व त्यांच्या नातेवाईकांनी जिल्हा बँकेच्या लक्ष्मीपुरी शाखेचा बनावट शिक्का तयार करून येणाऱ्या ठेवींचा भरणा या बनावट शिक्क्याद्वारे बँकेमध्ये दाखवून रोख रक्कमेचा अपहार केला. वर्ष पूर्ण झाल्यानंतर उचल केलेल्या ठेवी कमी करणे व बोगस चलने किर्दीस न दाखवता रेकॉर्ड तयार केले व तेच रेकॉर्ड संचालक मंडळास व लेखापरीक्षकांस दाखवले आहे.यामध्ये लेखापरीक्षक व संचालक मंडळाचीही फसवणूक केल्याचे अहवालात म्हटले आहे. संस्थेकडील रजिस्टर पाहता गेल्या दहा वर्षांमध्ये व्यवस्थापक परिट यांनी संस्थेचे खरे रेकॉर्ड कोणत्याही लेखापरीक्षकास व संचालक मंडळास दिलेले नाही. १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२४ या काळात तब्बल पाच वर्षे हा गैरव्यवहार सुरू असताना त्याचा संचालक मंडळासह चक्क लेखापरीक्षकांसही थांगपत्ता लागू नये याबध्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. म्हणजे लेखापरीक्षक, सहकार खाते, संचालक मंडळ यांच्यापेक्षाही पतसंस्थेचा साधा व्यवस्थापकही भारी पडल्याचे दिसत आहे.
अपहाराचा तपशील..
- रोज किर्दीवरील रोख शिल्लक : ४९ लाख ६४ हजार १८२
- जिल्हा बँक लक्ष्मीपुरी शाखा रक्कम : ६८ लाख ३० हजार ८२५
- ठेवीमधील अपहार : ११ कोटी ७१ लाख ३० हजार ७९७
- कर्जामधील अपहार : २ कोटी ५५ लाख ७ हजार ३६८.
- एकूण : १५ कोटी ४४ लाख ३३ हजार १७२
कुणी केला गैरव्यवहार ?संस्थेचे व्यवस्थापक पांडुरंग परिट त्यांच्या पत्नी संगीता परिट, मोठा मुलगा सुमित परिट, लहान मुलगा सुयोग परिट यांनी संगनमताने हा अपहार केला असून, अपहार केलेल्या रकमेचा वापर स्वत:ची मालमत्ता खरेदीसाठी केला आहे. त्या मालमत्तेचा हे कुटुंब उपभोग घेत आहे. व्यवस्थापक परिट यांचे १२ जानेवारी २०२३ ला निधन झाल्यानंतर या अपहार उघडकीस आला. त्यामुळे अपहारातील रकमेची या कुटुंबाकडून व्याजासह वसुली करावी, असे या अहवालात म्हटले आहे. हा अपहार इर्शाद अल्लाबक्ष देसाई, शुभम उल्हास लोखंडे, वीर हनुमान दूध संस्था कुरुकली या संस्थेचे सचिव शुभम एकनाथ परिट यांच्या सहकार्याने केला आहे.
संचालक मंडळाचा दोष नाहीसंस्थेच्या मंजूर पोटनियमातील तरतुदीनुसार संस्था अध्यक्ष व संचालक मंडळाने आपल्या कर्तव्य व जबाबदारीची जाणीव ठेवून संस्था कामकाज योग्यरीत्या पार पाडले आहे, अशी स्पष्ट टिप्पणी लेखापरीक्षकांनी केली आहे.