कोल्हापूर : खासगी स्वीय सहायकामार्फ त सोळा हजार रुपयांची लाच स्वीकारल्याचा गुन्हा दाखल झालेल्या तृप्ती माळवी यांच्या महापौरपदाचा राजीनाम्यावर येत्या ९ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शिक्कामोर्तब होणार आहे. दरम्यान, आज, शनिवारी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत राजीनाम्याबाबत निर्णय घेण्यात आला. तसा निर्णय नंतर हा माळवी यांना रुग्णालयात जाऊन सांगण्यात आला. त्यानुसार आज, सायंकाळीच तृप्ती माळवी यांनी आपला महापौरपदाचा राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते राजू लाटकर यांच्याकडे सुपूर्द केला. आज, शनिवारी सायंकाळी शासकीय विश्रामगृहावर आमदार हसन मुश्रीफ, राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष के. पी. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार, सभागृहातील पक्षाचे नेते राजू लाटकर, स्थायी समितीचे सभापती आदिल फरास यांची बैठक झाली. या बैठकीत काल, शुक्रवारच्या घडलेल्या प्रकरणाचा आढावा घेण्यात आला. एक नैतिक जबाबदारी म्हणून महापौरांनी राजीनामा देऊन न्यायालयीन पातळीवर आपले निर्दोषत्व सिद्ध करावे, यावर सर्व नेत्यांमध्ये एकमत झाले. बैठकीनंतर आर. के. पोवार, लाटकर व फरास असे तिघेजण राजारामपुरी येथील खासगी रुग्णालयात गेले; परंतु त्यांनी माळवी यांना पोलिसांनी भेटू दिले नाही. त्यामुळे माळवी यांचे मामा अनिल पाडगावकर यांना भेटून राष्ट्रवादी पक्षाने घेतलेला निरोप त्यांना दिला. महापौरपदाचा राजीनामा द्यायचा असेल तर तो महासभेपुढे द्यायचा असतो. त्यामुळे ९ फेब्रुवारी रोजी महापालिके ची सभा बोलाविण्याचा निर्णयही पक्षाने घेतला आहे. गडकरी लँडमाफीया महापौर माळवी यांचा स्वीय सहायक अश्विन गडकरी हा एरव्ही स्वत:च महापौर असल्यासारखे वावरत असे. माळवी यांचा महापालिकेतील कारभार तोच पाहात असल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तो रूबाब ठोकायचा. तो जमीन-खरेदी विक्रीचा व्यवसाय करतो. यामध्ये त्याने अनेकांच्या जमिनी दहशतीच्या जोरावर लुटल्याची चर्चा आहे. प्रसंगी महापालिका बरखास्त करू : चंद्रकांत पाटील कोल्हापूर : महापौर तृप्ती माळवी यांनी लाच घेतल्याचे स्पष्ट झाल्यास कोल्हापूर महापालिका बरखास्त करण्यासंबंधी मुख्यमंत्र्यांना विनंती केली जाईल, असे सहकार व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना स्पष्ट केले. ते म्हणाले, ‘परवाच विरोधी पक्षनेते मुरलीधर जाधव यांना बेटिंग प्रकरणात पकडण्यात आले. हे प्रकरण ताजे असतानाच महापौरांनी लाच घेणे हे शहराच्या दृष्टीने नामुष्कीजनकच आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. त्यामध्ये त्यांनी लाच घेतल्याचे स्पष्ट झाल्यास महापालिका बरखास्त करण्याबाबत मुख्यमंत्र्यांना जरूर विनंती करू.’ मतप्रदर्शन करण्यास नेत्यांचा नकार शुक्रवारच्या लाच प्रकरणावर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आपली प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. कोणाही नेत्याने मतप्रदर्शन व्यक्त केले नाही. हसन मुश्रीफ यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देण्यास स्पष्टपणे नकार दिला. ‘आर.कें.शी संपर्क साधा’ एवढेच त्यांनी सांगितले; तर आर. के. पोवार यांनी माळवी यांना राजीनामा देण्यास बजावले असून, न्यायालयात ‘दूध का दूध और पानी का पानी’ सिद्ध करण्यास त्यांना बजावण्यात आल्याचे सांगितले. महापौर कार्यालय झाकोळले शुक्रवारच्या कारवाईने महापौर कार्यालय झाकोळून गेले. दिवसभर कार्यालयात नगरसेवक, पदाधिकारी, अधिकारी, नागरिक यांची गर्दी झालेली असते; परंतु आज कार्यालयाकडे मोजके कर्मचारी वगळता कोणीही फिरकले नाही. कोणतीही लगबग कार्यालयात दिसली नाही. कर्मचारीही अद्याप सावरलेले नाहीत. महापौरांचे स्वीय सहायक, शिपाई, चालक आज सुन्न मनाने कार्यालयात आपापसांत बोलताना दिसत होते. विशेष म्हणजे अनेक पदाधिकारी, नगरसेवकांनीही आज महापालिकेत येण्याचे टाळले.
माळवींकडून महापौरपदाचा राजीनामा
By admin | Published: February 01, 2015 1:13 AM