इचलकरंजी : मुंबई येथे विषारी दारूमुळे नागरिक मृत्यू पावल्यानंतर जागे झालेल्या यंत्रणेने माणगाववाडी (ता. हातकणंगले) येथील गावठी दारू तयार करणाऱ्या भट्ट्यांवर कारवाई करून त्या उद्ध्वस्त केल्या. राज्य उत्पादन शुल्क आणि पोलीस दलाच्यावतीने संयुक्तपणे बुधवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली. यामध्ये अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असला तरी एकही आरोपी पोलिसांच्या हाती लागला नाही. या कारवाईत २५ अधिकारी, ९० कर्मचारी यांच्यासह दंगल नियंत्रण पथकाची एक तुकडी सहभागी झाली होती. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मिळालेली माहिती अशी, माणगाववाडी येथे गेल्या अनेक वर्षांपासून गावठी दारू तयार करणाऱ्या मोठ्या हातभट्ट्या आहेत. तेथूनच परिसरातील गावठी दारू अड्डाचालकांना दारू पुरवली जाते. या हातभट्ट्यांवरच कारवाई करावी, असे नियोजन करून बुधवारी पहाटेच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक राजेश कावळे यांच्या उपस्थितीत पोलीस दलाच्या मदतीने कारवाई करण्यात आली. यामध्ये ५० बॅरेल रसायन, ५० लिटर तयार दारू आणि २० रिकामे बॅरेल, होज पाईप, जर्मन डबे आणि दारू तयार करण्याचे साहित्य जप्त केले. यावेळी पूर्व अनुभव पाहता पोलिसांनी काळजी घेतली होती. तसेच कारवाई करताना सोबत दंगल नियंत्रण पथकाची एक तुकडीही होती. त्यामुळे कारवाईमध्ये अडथळा आला नसल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक रावसाहेब कोरे यांनी सांगितले. कारवाईत निरीक्षक संजय जाधव, विजय टिकोळे, राजेंद्र खोत, शिवाजी कोरे, आदींसह पोलीस सहभागी झाले होते. (वार्ताहर)
माणगाववाडीतील हातभट्ट्या उद्ध्वस्त
By admin | Published: June 25, 2015 1:24 AM