कोल्हापूर : बनावट नोटा जवळ बाळगणाऱ्या एका तरुणास कोल्हापुरात अटक करण्यात आली आहे. संबंधित तरुण चंदगड तालुक्यातील असून त्यास शहरातील शिवाजी पार्क परिसरात चिंतामणी अपार्टमेंटनजीक ताब्यात घेण्यात आले. प्रमोद उर्फ दयानंद पुंडलीक मुळीक (वय ३१ रा. मजरे शिरगाव, पो. नागनवाडी, ता. चंदगड, जि. कोल्हापूर) असे अटक केलेल्याच नाव आहे. त्याच्या ताब्यातून ५०० रुपयेच्या १४८ अशा सुमारे ७४ हजार रुपयेच्या बनावट नोटा जप्त केल्या. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलीस पथकाने आज, बुधवारी दुपारी केली.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस अंमलदार ओंकार परब यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार प्रमोद मुळीक हा बनावट नोटा घेऊन तो शिवाजी पार्कमध्ये येणार होता. त्यानुसार पोलीस पथकाने सापळा रचून शिवाजी पार्कमधील चिंतामणी अपार्टमेंट परिसरात मुळीक याला अटक केली. त्याच्या ताब्यातील एकूण ७४ हजार रुपये किंमतच्या १४८ बनावट नोटा जप्त केल्या. ह्या जप्त केलेल्या नोटांसह आरोपी ओंकार परब याला शाहुपुरी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक संजय गोर्ले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विनायक सपाटे, शेष मोरे, पोलीस अंमलदार सुनिल कवळेकर, ओंकार परब, अमोल कोळेकर, अजय वाडेकर, वसंत पिंगळे, संदीप कुंभार, नितीन चोथे, तुकाराम राजीगरे, सागर कांडगावे, अनिल जाधव यांच्या पथकाने केली.
बनावट नोटा बाळगणाऱ्या एकास कोल्हापुरात अटक, ७४ हजाराच्या नोटा जप्त; चंदगड तालुक्यातील तरुण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 8:16 PM