कोल्हापूर : घरफाळा, थेट पाइपलाइन, ई गव्हर्नन्स, कचरा उठाव खासगीकरण अशा अनेक प्रकरणांत मोठा भ्रष्टाचार झाला असून, महानगरपालिका विकत घेतल्यासारखा कारभार पालकमंत्री सतेज पाटील यांनी सुरू केला असल्याचा आरोप माजी महापौर सुनील कदम व माजी नगरसेवक सत्यजित पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला.
डीवायपी माॅल तसेच ड्रीम वर्ल्ड वाॅटर पार्कच्या घरफाळ्यासंदर्भात आम्ही केलेल्या आरोपांना बगलबच्च्यांमार्फत उत्तरे न देता एका व्यासपीठावर समोरासमोर येऊन स्वत: पालकमंत्री सतेज पाटील यांनी आरोपांचे खंडन करावे. त्याठिकाणी माजी खासदार धनंजय महाडिकसुद्धा उपस्थित राहतील, असे खुले आव्हान त्यांनी यावेळी दिले. आम्ही बी मॅट महाविद्यालयाचा कर भरला आहे, तुम्ही ‘डीवायपी’चा १५ कोटींचा घरफाळा कधी भरताय सांगा, अशी विचारणाही यावेळी त्यांनी केली.
डीवायपी मॉलच्या घरफाळ्याबाबत आम्ही केलेल्या आरोपांना बगल देण्याकरिता सोलापूरमधील भीमा कारखान्यातील कर्मचाऱ्यांच्या पगाराचा तसेच महाडिक उद्योगातील कर्मचाऱ्यांच्या पगाराचा मुद्दा पालकमंत्री पाटील यांनी बगलबच्च्यांमार्फत उपस्थित करून मूळ विषयाला टाळत आहेत. भीमा कारखान्याबाबत केलेले आरोप मागे घेऊन त्याबाबत आठ दिवसांत माफी मागावी, अन्यथा पाच कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करू, असा इशाराही कदम यांनी दिला. महाडिक उद्योगातील पाच हजार कर्मचाऱ्यांची यादी, फोन नंबर्ससह दिले आहे ती यादी पहावी, असे कदम म्हणाले. यावेळी विजय सूर्यवंशी, राजसिंह शेळके, किरण नकाते उपस्थित होते.
- दोनशे कोटींचा घरफाळा बुडाला
पालकमंत्री पाटील यांनी मॉल व ड्रीम वर्ल्डचा घरफाळा चोरल्यानंतर अनेक मोठ्या मिळकतधारकांनी तसेच अधिकाऱ्यांनी तशाच पद्धतीने घरफाळे कमी करून घेतले. त्यामुळे महापालिकेचे सुमारे २०० कोटींचे नुकसान झाले आहे. घरफाळा बुडवायचा कसा, हे त्यांनी दाखवून दिले, असे सुनील कदम म्हणाले.
-
- अधिकाऱ्यांना मारहाण
कोविडच्या काळात चांगले काम केले, असा डंका पिटवणारे मंत्री व त्यांचे समर्थक आपल्या हिताचे काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांना मारहाण करत आहेत. एका अधिकाऱ्याला शासकीय विश्रामगृहावर मारहाण झाली. त्यामुळे काही अधिकारी रजा काढत आहेत, लेखी मागणी करूनही माहिती देण्यास टाळाटाळ करत आहेत, असे कदम यांनी सांगितले.