- विश्वास पाटील।कोल्हापूर : मराठा समाजासाठी स्थापन करण्यात आलेल्या सारथी संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी राज्य सरकारने डी. आर. परिहार यांची नियुक्ती केली आहे. परिहार यांनी ‘बार्टी’ संस्थेच्या माध्यमातून मागासवर्गीय समाजातील लाखो तरुणांना विविध शिष्यवृत्ती, प्रशिक्षण देऊन रोजगाराभिमुख बनविले. त्यामुळे ते ‘सारथी’ संस्थेत काय प्रकल्प राबविणार आहेत, याबद्दल समाजात उत्सुकता आहे. त्यांच्याशी साधलेला हा संवाद....मराठा तरुणांसाठी काय करणार?
‘महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात मराठा समाजाचे प्रमाण ३० टक्क्यांपर्यंत आहे. राज्याच्या सर्व भागांत समाजाच्या मुख्य धारेतील हा समाज आहे. त्यामुळे सारथी संस्थेच्या माध्यमातून आम्ही शिक्षित, उच्चशिक्षित आणि बेरोजगार तरुण असे सर्व घटक डोळ्यांसमोर ठेवून त्यांच्या प्रशिक्षणाची व्यवस्था करीत आहोत. ‘बार्टी’ संस्थेच्या माध्यमातून आम्ही जे कोर्स सुरू केले, प्रशिक्षण दिले, त्याचा मागासवर्गीय समाजातील तरुणांना निश्चितच चांगला फायदा झाला. त्या तुलनेत मराठा समाजासाठी असे काम करण्याचे आव्हान मोठे आहे आणि ते आम्ही नक्की पेलू.’
प्राधान्यक्रम काय असेल?एखाद्या संस्थेची वेबसाईट करण्यासाठी सामान्यपणे सहा महिने लागतात. परंतु, आम्ही आयडी मिळवून ते काम तीन दिवसांंत पूर्ण केले आहे. हीच गती इतर योजनांच्या बाबतीत असेल. येत्या चार-पाच दिवसांत तुम्हाला सारथी संस्थेच्याही विविध कोर्सच्या जाहिराती वृत्तपत्रांतून दिसू लागतील. मराठा समाजाचे नेमके प्रश्न व ते सोडविण्यासाठी काय करायला हवे, याचा चांगला अभ्यास करूनच आम्ही विविध योजनांची आखणी केली आहे.
योजना काय आहेत?या संस्थेच्या माध्यमातून विविध स्पर्धा परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी आवश्यक कोचिंग व मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाईल. राज्यातील सर्व विभागांतील लोकांना सोईचे व्हावे यासाठी पुणे, कोल्हापूरसह लातूर, औरंगाबाद, नाशिक, मुंबई, अमरावती आणि नागपूर येथे प्रादेशिक विभाग सुरू करण्याचा प्रयत्न आहे.निधी मिळणे गरजेचेसारथी संस्थेसाठी पुणे मुख्यालयाच्या स्तरावर ६१ कायमस्वरूपी पदे व आठ प्रादेशिक स्तरावरील विभागांसाठी ४८ अशी एकूण १०९ पदे भरावी लागतील. त्याशिवाय मुख्यालय स्तरावर ५२१ व प्रादेशिक स्तरावर ३२० अशी ८४१ पदे कंत्राटी स्वरूपात भरावी लागणार आहेत. त्यासाठी वर्षाला साधारणत: २९८ कोटींचा नियोजित अंदाजित खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. या संस्थेला गती द्यायची असेल तर हा निधी सरकारकडून तातडीने उपलब्ध होण्याची गरज आहे.मराठा समाजातील तरुणांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड आहे. त्यामुळेच समाजात अस्वस्थता जाणवते. यासाठी त्यांच्यात कौशल्य विकास करून त्यांना रोजगार देण्यास आमचे प्राधान्य राहील. सरकारी क्षेत्रात मराठा समाजाला आरक्षणाच्या माध्यमातून जेवढ्या नोकऱ्या मिळतील, त्याहून अधिक पटींनी कौशल्य विकासाच्या माध्यमातून नोकºया व रोजगाराच्या संधी मिळू शकतात.
सारथी संस्थेच्या माध्यमातून विविध प्रकल्पाद्वारे मराठा समाजातील तरुणाईच्या विकासाचा रोडमॅपच आम्ही तयार केला - डी. आर. परिहार