आयुब मुल्ला - खोची टाइमपास करू नका, कष्टाची सतत तयारी ठेवा. भीती सर्वांनाच वाटते, त्याबद्दल न्यूनगंड काढून टाका. निश्चित ध्येयाकडे अभ्यासातून वाटचाल करा. यश मिळते. त्यातून आनंद मिळतो, पण हे यश स्वत:साठी उपयोगता न आणता समाजाच्या विकासासाठी सत्कारणी लावले पाहिजे, असा सल्ला देत अनुभवाचे कथन करीत अडथळे, संघर्षाचा प्रवास उत्स्फूर्तपणे यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंतांनी मांडला. त्याला तितक्याच ताकदीने उपस्थितांनी प्रतिसाद देत एक प्रकारचा सलामच केला.निमित्त होतं यूपीएससीतील गुणवंतांच्या सत्कार समारंभाचे; पण प्रेरणा मात्र मिळावी शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आपणही यशवंत होण्याची. वारणानगर येथे सुमारे दोन हजार प्रेक्षकांच्या उपस्थितीत राज्यातील १६ जणांचा सत्कार केला आणि त्यांची मनोगते ऐकण्याची संधी उपलब्ध करून दिली. ज्ञानाची श्रीमंती हीच सर्वश्रेष्ठ आहे. तीच समाजाचा विकास करू शकते. यास बांधील असल्याचे वचनच या सत्कारमूर्तींनी सर्वांसमोर दिले. वैद्यकीय पदवी घेऊनसुद्धा या परीक्षेत उत्तीर्ण होऊन शासनाच्या सेवेत जाण्याचा मनोदय सहाजणांनी व्यक्त केला. यामध्ये संग्राम पाटील (पंढरपूर) म्हणाला, आई-मावशी-काका यांचे मला प्रोत्साहन मिळाले. कौटुंबिक पार्श्वभूमी वैद्यकीय शिक्षणाची असून, कुटुंबातील १४ लोक डॉक्टर आहेत, तरीसुद्धा मी यापासून अलिप्त झालो. समाजाचे आरोग्य सुधारणे महत्त्वाचे मानले. डॉक्टर क्षेत्रात मला चांगले करिअर करता आले असते, परंतु समाजाचा सर्वांगीण विकास हा प्रशासकीय सेवेतून होतो, हाच माझा ध्यास होता. तो मी कृतीतून दाखवून देणार आहे.निसर्ग हिवरे (नंदुरबार) हा बी.टेक. झालेला, परंतु दहावीत असताना त्याचा सत्कार कलेक्टर यांच्या हस्ते झालेला. हाच विचार त्याला स्वस्थ बसू देत नव्हता. यातूनच कष्टातून ही परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे सांगून, माझा आनंद सत्यात उतरल्याचा आनंद झाल्याचे सांगितले.मनोगतासाठी उभा राहण्याचा पहिलाच प्रसंग असल्याने मनमोकळेपणाने सांगत शालेय शिक्षण मराठी माध्यमातून घेऊन डॉक्टर झालो. त्यानंतर जिल्हाधिकारी प्रवीण हेडाम यांना भेटलो. यशस्वी झालो, पण थोडा उशीर झाला. सुरुवातीला दिशा निश्चित करा, असा सल्ला ज्ञानेश्वर वीर (पुणे) यांनी दिला.एम.बी.बी.एस. होऊनसुद्धा ही परीक्षा दिली. तिसऱ्या प्रयत्नात यश मिळाले. समाजासाठी काय करायचे आहे, हे सुमित गरुड (इस्लामपूर) यांनी सांगितले.मिलिंद देबाजे म्हणाले, शरीराचा डॉक्टर असताना मला समाजाचा डॉक्टर होणे पसंत पडले. एम.ए. झालेले (बारलोणी माढा) महेश लोंढे म्हणाले, कष्टावरच तरलो. टाईमपास केला नाही. संपूर्ण शिक्षण मराठीतून घेऊन एमपीएससी, यूपीएससी उत्तीर्ण झालो. चुलत्याच्या किराणा दुकानातील रद्दी वाचनाने माहिती प्रचंड मिळाली. अभ्यास ओझं म्हणून करू नका, एन्जॉय करा. स्पर्धा परीक्षेतील यशाचा मार्ग दाखविणारा हा कार्यक्रम जीवनातील समाधानाचे धागेही कसे विणता येतात हा सांगणारा, सर्वांनाच प्रोत्साहन करणारा ठरला. माजी मंत्री विनय कोरे यांच्या उपस्थितीत अध्यक्ष एन. एच. पाटील यांनी सलग आठव्या वर्षी हा कार्यक्रम दिमाखदार पार पाडला.नागपूरची श्वेता पाटील (बी.ई. कॉम्प्युटर) म्हणाली, इतिहास, भूगोल, समाजशास्त्र हे पर्यावरणाची ओळख देणारे विषयच मी अधिक जाणून घेतले. लहानपणापासून त्याची टिप्पणी डायरीत केली. थोरांचा आदर्श समोर ठेवून त्यांची चरित्रे वाचली अन् पे्ररणा मिळाली. मी सहज यशस्वी झाले.पन्हाळ्याचे उपनिबंधक म्हणून काम करीत असलेले राहुल कर्डिले (नेवासा) म्हणाले, बारावीत ६२ टक्के गुण मिळाले. इंजिनिअरिंगमध्ये दोनवेळा नापास झालो, परंतु स्पर्धा परीक्षेत मात्र प्रयत्नातून यश मिळविले. वर्तमानपत्राचे वाचन मला उपयोगी पडले.
मनोगतातून दिली प्रेरणा अन् गुणवंतांनी जिंकली मने
By admin | Published: August 09, 2015 11:49 PM