कोल्हापूर : सध्या देशात सत्तेचा गैरवापर करून स्वातंत्र्याची गळचेपी केली जात आहे. देशात महिलांवरील अत्याचारांत वाढ झाली आहे. ‘बेटी बचाव’चा नारा दिला जात असला तरी प्रत्यक्षात स्त्रियांना पुन्हा गुलामगिरीत ढकलण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. त्यामुळे २०१९ च्या निवडणुकीत या मनुवादी सरकारला उलथवून टाकण्याचे आवाहन स्मिता पानसरे यांनी केले.
देशात शांतता व लोकशाही प्रस्थापित होण्यासाठी ‘बातें अमन की’ या देशव्यापी जथ्थ्याचे रविवारी कोल्हापुरात आगमन होताच शाहू स्मारक भवन येथे आयोजित जाहीर कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी उमा पानसरे होत्या.
पानसरे म्हणाल्या, महिला, मुस्लिम आणि दलितांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात आहे. शालेय अभ्यासक्रम बदलून नव्या पिढीला चुकीची माहिती दिली जात आहे. या विरोधात आवाज उठविणे गरजेचे आहे. त्यामुळे जात, धर्म, गट-तट बाजूला ठेवून ८ आॅक्टोबर रोजी ‘संविधान बचाव’ अशी घोषणा देत मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यामध्ये सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.
भारतीय महिला फेडरेशनच्या निमंत्रक सुनीता अमृतसागर म्हणाल्या, महिलांचे हक्क मिळविण्यासाठी, त्यांच्यामध्ये जनजागृती करण्यासाठी ‘बातें अमन की’ ही देशव्यापी मोहीम २२ सप्टेंबरपासून सुरू झाली आहे. दिल्ली येथे १३ आॅक्टोबरला तिची सांगता होणार आहे. यामध्ये महिला संघटना व सामाजिक संघटनांनी थिरूवनंथपुरम, कन्याकुमारी, जम्मू-काश्मीरमधील तंगदर, आसाममधील गुवाहाटी, दिल्ली या पाच जथ्यांचे नियोजन केले आहे. हे सर्व जथ्थे देशातील विविध भागांत शांती, विवेक, मानवतावादी विचारांचे संदेश देत दिल्लीत एकत्र येऊन आंदोलन करणार आहेत.
राजस्थानच्या राजकुमारी डोंगरा म्हणाल्या, स्त्रियांवरील अन्याय व अत्याचारांत वाढत होत आहे. आज स्त्रियांची घरी आणि बाहेर दोन्ही ठिकाणी मानहानी होत आहे. गर्दी जमवत त्या गर्दीचे रूपांतर झुंडशाहीत होत आहे. या विरोधात एकत्र येऊन लढा देण्यासाठी ही मोहीम आहे. गुजरातच्या नूरजहॉँ दिवाण म्हणाल्या, लोकांचा आवाज दाबण्याचे काम सुरू आहे. संविधानाचे उल्लंघन होत आहे. या विरोधात आवाज उठविणे गरजेचे आहे.
याप्रसंगी ‘मुस्कान’ संस्थेच्या सुधा म्हणाल्या, आमच्यावर मानसिक व भावनिक या दोन्ही पद्धतींनी अत्याचार होत आहेत. आमचा कोणीच विचार करीत नाही. काही ठिकाणी सुरक्षा देणाऱ्या यंत्रणांकडूनच आमच्यावर अन्याय केला जात आहे. याविरोधात आता आम्ही एकत्र येऊन लढा देणार आहे.
वेश्या अन्याय मुक्ती परिषदेच्या संगीता, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या वर्षा लव्हटे, महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या स्वाती क्षीरसागर यांनी मनोगत व्यक्त केले. सभेच्या प्रारंभी प्रबोधन गीत सादर करण्यात आले; तर ‘माझी शाळा’मधील विद्यार्थ्यांनी समूहगीत सादर केले.
यावेळी सहनिमंत्रक स्नेहल कांबळे यांनी प्रास्ताविक केले. सभेला सुमन पाटील, नाजमिन, स्नेहल कांबळे, कविता वाळवेकर, दीपाली कोळी, शुभांगी पाटील, रूपाली कदम यांच्यासह विविध महिला आघाड्यांचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.