कोल्हापूर : भाजी विक्रीसाठी मंडईतच बसण्याचा आग्रह विक्रेत्यांनी धरल्यामुळे शुक्रवारी सकाळी कपिलतीर्थ भाजी मंडईत महापालिका कर्मचारी आणि विक्रेते यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. सुमारे दोन तासाच्या वादावादीनंतर पालिका कर्मचाऱ्यांनी मंडईचे सर्व मार्ग बॅरिकेट्स लावून बंद केले.
कोल्हापूर शहरात जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. भाजीसह सर्वच जीवनावश्यक वस्तू या विक्रेते व दुकानदारांनी घरपोच देण्याच्या आहेत. दुकानात तसेच रस्त्यावर, मंडईत बसून विक्री करता येणार नाही, असा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. गुरुवारी त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. परंतु शुक्रवारी मात्र कपिलतीर्थ मंडईतील विक्रेत्यांनी त्यास जोरदार विरोध केला.
विक्रेत्यांनी मंडईत बसूनच भाजी विक्री करण्याचा आग्रह धरला. त्यांनी आपली विक्रीही सुरू केली. परंतु त्याची माहिती कळताच महापालिकेची पथके त्याठिकाणी पोहोचली. उपायुक्त शिल्पा दरेकर, शहर अभियंता नारायण भोसले, इस्टेट विभाग प्रमुख सचिन जाधव, अतिक्रमण विभाग प्रमुख पंडित पोवार हेही त्याठिकाणी पोहोचले. तुम्हाला मंडईत बसून भाजी विक्री करता येणार नाही, असे त्यांनी विक्रेत्यांना सांगितले. परंतु विक्रेते काही ऐकायला तयार नव्हते.
आमच्यामुळेच कोरोना होतो का? आम्ही लांब लांब बसून भाजी विक्री करताेय, असे विक्रेते सांगत होते. माजी नगरसेवक अजित ठाणेकर, संदीप वीर, राजू जाधव यांनीही विक्रेत्यांची बाजू घेतली. बरीच वादावादी झाली. विक्रेत्यांच्या या भूमिकेमुळे लक्ष्मीपुरीतील भाजी विक्रेते, फळे विक्रेतेही रस्त्यावर आले आणि त्यांनी व्यवसाय सुरू केले. विक्रेते ऐकत नाहीत म्हटल्यावर महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सक्तीने भाजी मंडई बंद केली. तसेच मंडईत जाणारे रस्ते चारी बाजूने बॅरिकेट्स लावून बंद केले. तसेच स्पीकरवरून मंडई बंद असल्याचे वारंवार सांगण्यात आले. त्यामुळे दिवसभर ही मंडई बंद राहिली.
लक्ष्मीपुरीतील भाजी मंडई पोलिसांनी बंद पाडली. फळे विक्रेते, भाजी विक्रेते यांच्यासह काही दुकाने उघडी होती, तीही बंद करण्यास भाग पाडले. भाजी मंडईत बसणाऱ्या विक्रेत्यांकडे गल्लोगल्ली जाऊन फिरून भाजी विक्री करण्याची यंत्रणा नाही. त्यांच्याकडे चारचाकी वाहन अथवा रिक्षा नाहीत. त्यामुळेच मंडईत बसून नियमांचे पालन करून भाजी विकतो, अशी त्यांची मागणी आहे.