कोल्हापूर : परवापर्यंत एकमेकांना पाण्यात बघणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ व शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख संजय मंडलिक हे एकत्र आले आहेत. रविवारी या उभय नेत्यांमध्ये तब्बल दीड तास शासकीय विश्रामगृह येथे बैठक होऊन जिल्हा बॅँकेच्या निवडणुकीबाबत चर्चा झाली. कागल तालुक्याच्या राजकारणातून दिवगंत नेते सदाशिवराव मंडलिक व आमदार हसन मुश्रीफ यांच्यात संघर्षाची ठिणगी पडली. त्याचे पुढे वणव्यात रूपांतर झाले आणि कागल तालुक्यासह जिल्ह्याचे राजकारण पूर्णपणे बदलले. त्यानंतर हमीदवाडा कारखान्यापासून या दोन नेत्यांतील संघर्ष वाढतच गेला. ग्रामपंचायतींपासून लोकसभा निवडणुकीपर्यंत सर्व ठिकाणी दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांनी डोकी फोडून घेतली. त्याला दोन्ही नेत्यांनी प्रोत्साहनच दिले. लोकसभा निवडणुकीत प्रा. संजय मंडलिक यांना पराभूत करण्यासाठी आमदार मुश्रीफ यांनी कंबर कसली आणि त्यात ते यशस्वीही झाले. विधानसभा निवडणुकीत मुश्रीफ यांना पराभूत करण्यासाठी प्रा. मंडलिक यांच्यासह सदाशिवराव मंडलिक यांनी मतदारसंघ पिंजून काढला. ‘गोकुळ’ निवडणुकीतही एकमेकांच्या विरोधात भूमिका घेतली, पण रात्रीत जिल्हा बँकेच्या राजकारणाने दोन्ही गटांनी एकत्र आणले. प्रक्रिया सहकारी संस्था गटातून संजय मंडलिक यांच्यासाठी हसन मुश्रीफ यांनी माघार घेतली तर मंडलिक यांनी विकास संस्था गटातून मुश्रीफ यांना ‘बाय’ दिला. बँकेची प्रचारयंत्रणा कशी राबवायची याबाबत विचारविनिमय करण्यासाठी रविवारी शासकीय विश्रामगृह येथे आमदार मुश्रीफ व प्रा. मंडलिक यांच्यात चर्चा झाली. यावेळी भैया माने, युवराज पाटील, बंडोपंत पाटील-म्हाकवेकर, यांच्यासह दोन्ही गटांतील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. ‘राजकीय सोयी’साठी दोन नेते एकत्र आल्याने त्यांच्या गटांच्या कार्यकर्त्यांत मात्र याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
मंडलिक-मुश्रीफ एकत्र
By admin | Published: April 27, 2015 12:52 AM