विश्वास पाटील ल्ल कोल्हापूर सोळाव्या लोकसभेचा गुलाल उधळण्यासाठी आता काही तासांचाच अवधी राहिला आहे. शुक्रवारी दुपारी बारापर्यंत गुलाल कुणाला लागणार, हे स्पष्ट होणार असले तरी, आतापर्यंतच्या राजकीय वाटचालीत खासदार सदाशिवराव मंडलिक व खासदार राजू शेट्टी यांच्या नशिबीच विजयाची रास असल्याचे दिसते आहे. त्यामुळे हीच परंपरा यापुढेही कायम राहणार की ती या वेळेला खंडित होणार, हीच आता उत्सुकता आहे. कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघांतील प्रमुख चार उमेदवारांची सार्वत्रिक निवडणुकीतील यशाचा लेखाजोखा मांडल्यास त्यामध्ये खासदार मंडलिक व शेट्टी यांची विजयाने जास्त काळ सोबत केल्याचे दिसते. या दोघांच्या राजकीय जीवनात नशीब हादेखील अत्यंत महत्त्वाचा घटक राहिला आहे. हाच अनुभव संजय मंडलिक यांच्याबाबतीतही आहे. मंडलिक यांनी कोणतीही भूमिका घेतली तरी इतरांची गणिते चुकतात; परंतु साधते ते मंडलिक यांचेच, असेच आजपर्यंत घडत आले आहे. प्रत्येक वेळी त्यांच्या मदतीला उघडपणे अथवा पडद्याआड अशा कोणत्या तरी शक्ती धावून येतात आणि जे अशक्य आहे असे वाटते ते बघता-बघता जमून जाते आणि मंडलिक गुलालाचे धनी होऊन जातात. मंडलिक पिता-पुत्रांच्या आजपर्यंतच्या वाटचालीचा विचार केल्यास खासदार मंडलिक यांनी तब्बल सातवेळा विधानसभेची निवडणूक लढविली. त्यापैकी चारवेळा ते विजयी झाले. तीनवेळा पराभूत झाले. मध्येच एकदा १९६७ला त्यांनी बिद्री-बोरवडे मतदारसंघातून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली व जीवनराव सावंत यांच्यासारख्या चळवळीतील उमेदवाराचा पराभव करून ते विजयी झाले. आयुष्याच्या पुढच्या वाटचालीत त्यांनी लोकसभेची निवडणूक चारवेळा लढविली व चारीही वेळा ते विजयी झाले. मंडलिक यांनी विधानसभेची पहिली निवडणूक बंडखोरी करून लढवली. त्यांचा १९७२चा पहिला विजयही बंडखोरी करूनच झाला आहे. संजय मंडलिक आजपर्यंतच्या राजकारणात अपराजित राहिले असून, त्यांनीही काँग्रेसविरुद्ध बंडच केले आहे. आमदार महादेवराव महाडिक यांना कोल्हापूरच्या जनतेने विधानसभेला निवडून दिलेले नाही. धनंजय महाडिक यांनी २००४ची निवडणूक शिवसेनेतर्फे लढवली; परंतु त्यावेळी त्यांचा निसटता पराभव झाला. गत निवडणुकीत त्यांचा राजकीय बळी गेला. पुढे विधानसभेच्या २००९च्या निवडणुकीतही त्यांचा निसटता पराभव झाला. आता या निवडणुकीत ते हा पराभवाचा सगळा बॅकलॉग भरून काढून वारंवार ‘हाता’तून निसटणारा विजय खेचून आणतात का, हीच उत्सुकता आहे. हातकणंगले मतदारसंघातील उमेदवार खासदार शेट्टी यांनी सगळी मैदाने पहिल्याच लढतीत मारली आहेत. तसा विचार करता त्यांनी एकाच लांगेवर तीन कुस्त्या मारल्या आहेत. ज्येष्ठ नेते कल्लाप्पाण्णा आवाडे यांनीही राजकारणातील अनेक उन्हाळे-पावसाळे पाहिले आहेत. लोक कुणाला संसदेत पाठवितात आणि कुणाला पुन्हा शिवारात, हे समजण्यासाठी थोडा धीर धरा मित्रांनो....!
मंडलिक-शेट्टी यांच्या नशिबी ‘विजयी’ रास
By admin | Published: May 15, 2014 12:58 AM