- विश्वास पाटील
कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून गेल्या निवडणुकीत शिवसेनेकडून पराभूत झालेल्या संजय मंडलिक यांच्या खासदारकीमागे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांचा स्वत:ची आमदारकी शाबूत करण्याचा प्रयत्न आहे. मुरगूडला शनिवारी झालेल्या समारंभात मुश्रीफ यांनी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संजय मंडलिक यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणतील, असे जाहीर केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान खासदार धनंजय महाडिक आहेत. मंडलिक हे शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख व अजून तरी त्याच पक्षाचे लोकसभेचे उमेदवार आहेत, असे असताना निवडणुका वर्षभर लांब असतानाच मुश्रीफ यांनी थेट मंडलिक यांची उमेदवारी जाहीर करून खळबळ उडवून दिली आहे.
मुश्रीफ यांच्या प्रत्येक विधानामागे काही तरी चाल असते. कोणतेही विधान ते विचारपूर्वक करतात. आताचेही मुरगूडमधील त्यांनी केलेली घोषणा त्याच स्वरूपाची आहे. पक्षांमध्ये त्यांच्यात व खासदार महाडिक यांच्यात वर्चस्वाचा वाद लपून राहिलेला नाही. त्यात महाडिक यांची विधानसभा व महापालिकेच्या निवडणुकीतील भूमिका ही भाजपला पूरकच नव्हे तर थेट त्या पक्षाला मदत करणारीच होती. त्यामुळे राष्ट्रवादीत असूनही त्यांना पक्षात कायमच उपरेपणाची वागणूक मिळाली. ‘संसदेत सर्वाधिक प्रश्न विचारणारा खासदार’ असा सन्मान होऊनही पक्षाने त्यांचा साधा सत्कार करण्याचे सौजन्य दाखविले नाही. महाडिक यांनीच भरविलेल्या भीमा कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी मुश्रीफ यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासमोरच आपले खासदार महाडिक यांच्याशी मतभेद असल्याचे जाहीर करून टाकले आहे. त्यामुळेच गेल्या काही दिवसांत महाडिक यांनीही भाजप व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याबरोबरचा संपर्क वाढविला आहे. जिल्ह्याच्या राजकारणात आता भाजप महाडिक गटाच्याच ‘सोयीने राजकारण’ करत आहे. त्यामुळे धनंजय महाडिकही तसा काही निर्णय घेण्याची शक्यता अवास्तव नाही. अशा स्थितीत राष्ट्रवादीपुढे नवा उमेदवार देण्याचे संकट असू शकेल. सद्य:स्थितीत ही जबाबदारी मुश्रीफ यांच्यावरच येऊ शकेल. मध्यंतरी त्यांनीही स्वत: पक्षाने जबाबदारी दिल्यास आपली तयारी असल्याचे सुतोवाच केले आहे; परंतु स्वत: लोकसभा लढविण्यापेक्षा संजय मंडलिक यांना राष्ट्रवादीतून संधी देऊन आपण विधानसभा लढविण्यास ते प्राधान्य देतील, असे चित्र आहे.
विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत मुश्रीफ यांना निवडून येण्यासाठी फारच झगडावे लागले. लोकांचा ‘शब्द’ झेलूनही मला विजयासाठी इतका त्रास झाला हे चांगले नाही, अशी त्यांची स्वत:चीही भावना होती. त्यामुळे आता सन २०१९ च्या निवडणुकीत पुन्हा जिंकायचे असेल तर कागल तालुक्यातून चांगले मताधिक्य हवे आहे. गेल्या निवडणुकीत कागलची हद्द ओलांडली तेव्हा त्यांच्यावर सुमारे ३८१ मतांचे अल्प का असेना लिड होते. उत्तूरमधून उमेश आपटे त्यांच्या मदतीला धावून आल्याने मुश्रीफ यांना गुलाल मिळाला. गेल्या निवडणुकीत दिवंगत विक्रमसिंह घाटगे त्यांच्यासोबत होते. संजय घाटगे व संजय मंडलिक हे एकत्र होते. आता समरजित घाटगे भाजपमध्ये असल्याने त्यांनी रिंगणात उतरण्याची जय्यत तयारी केली आहे. संजय घाटगे हे त्यांचे पारंपरिक शत्रू आहेत. मग कागलच्या राजकारणातील मंडलिक गट सोबत घेतल्याशिवाय मुश्रीफ यांची आमदारकी शाबूत राहत नाही, ही खरी मेख आहे. मुश्रीफ यांची एक ख्याती आहे. त्यांना जेव्हा स्वत:चा फायदा अपेक्षित असतो, तेव्हा ते त्याला दुसºयाच्या कल्याणाचे गोंडस रूप देतात. संजय मंडलिक यांच्या खासदारकीमागेही तेच दिसते. विधानसभेला तिरंगी लढत झाल्यास मुश्रीफ यांचा विजय नक्की मानला जातो. ‘एकास एक’ लढत झाली आणि मंडलिक गट भक्कमपणे पाठीशी राहिला तर त्यांना ही लढत सोपी होऊ शकते म्हणून त्यांनी संजय मंडलिक यांच्या उमेदवारीचा ‘बॉम्ब’ टाकून त्या गटाला खूश केले आहे.
पवार यांचे पाठबळराष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आहेत परंतु तरीही मुश्रीफ परस्पर खासदारकीच्या उमेदवारीची घोषणा करून टाकतात याला महत्त्व आहे. पवार यांची मुश्रीफ यांच्या मोर्चेबांधणीला एकतर सहमती असली पाहिजे. दि. ९ जानेवारीस स्वत: पवारच मंडलिक गटाच्या कार्यक्रमासाठी येत आहेत. तिथे याबाबत काही सूतोवाच केले तर मंडलिक यांच्या उमेदवारीच्या घडामोडी पुढे सरकतील. मुश्रीफ-संजय मंडलिक व आमदार सतेज पाटील हे एकत्र आले तर खासदार महाडिक यांच्यापुढे कडवे आव्हान उभे करू शकतात.
घाटगे गटाचे काय..? आता मंडलिक व मुश्रीफ गट जर तालुक्याच्या राजकारणात एकत्र येणार असतील तर मग दोन्ही घाटगे गटाचे मनोमिलन होणार का, याबद्दल आता खरी उत्सुकता आहे. ‘विधानसभेचा उमेदवार कोण आणि आपला खरा राजकीय शत्रू कोण,’ याचा विचार करून हा निर्णय अपेक्षित आहे. कोण किती समजूतदारपणा दाखविणार, यावर हे मनोमिलन अवलंबून आहे.
शिवसेनेत अस्वस्थतामंडलिक हे आजही शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख आहेत. त्या पक्षाच्या चिन्हावर त्यांनी गेल्या निवडणुकीत जोरदार लढत दिली आहे. त्यामुळे ते पुन्हा शिवसेनेकडूनच रिंगणात उतरणार की राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधणार याबद्दल ते स्वत: कोणतीच भूमिका स्पष्ट करायला तयार नाहीत.
विधानसभा २०१४ चा निकालहसन मुश्रीफ (राष्ट्रवादी) : १ लाख २३ हजार ५२६संजय घाटगे (शिवसेना) : १ लाख १७ हजार ६९२परशुराम तावरे (भाजप) : ५ हजार ५२१मुश्रीफ ५ हजार ८३४ मतांनी विजयी