मुरगूड : स्वर्गीय विक्रमसिंहजी घाटगे यांनी अत्यंत पारदर्शक कारभार करून संपूर्ण देशामध्ये सर्वोत्कृष्ट चालवलेल्या शाहू साखर कारखान्याच्या लागलेल्या निवडणुकीत समरजितसिंह घाटगे यांना मंडलिक गटाचा बिनशर्त पाठिंबा राहील, अशी घोषणा सदाशिवराव मंडलिक साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रा. संजय मंडलिक यांनी केली. फक्त कारखान्यासाठीच नव्हे, तर समरजितसिंह घाटगे यांनी चालवलेल्या सर्व विधायक उपक्रमांनाही आपला पाठिंबा राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुरगूड (ता. कागल) येथे जमादार चौकात मंडलिक युवा प्रतिष्ठानच्या एक्कावन्नाव्या शाखेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मारुती ओतारी होते. यावेळी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विरेंद्रसिंह मंडलिक प्रमुख उपस्थित होते. प्रा. मंडलिक म्हणाले, खासदार मंडलिक यांनी राजकारणामध्ये कधीच घराणेशाही आणण्याचा प्रयत्न केला नाही. पण मुरगूडच्या राजकारणात मात्र एखाद्या घराण्याची प्रतिष्ठा जपण्याचा प्रयत्न सुरू आहे. शहराचा विकास महत्त्वाचा असून, कोट्यवधीचा निधी मिळाल्याचा डांगोरा पिटला जातोय, पण प्रत्यक्षात मात्र शहराचा विकास झालेला नाही. यावेळी वीरेंद्र मंडलिक, माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके यांनी मनोगत व्यक्त केले. मेळाव्यास विरोधी पक्षनेते किरण गवाणकर, नगरसेवक सुहास खराडे, वैशाली सुतार रूपाली सणगर, सुजाता पाटील, अनिता भोसले, माजी नगराध्यक्ष सुखदेव येरूडकर, माजी नगराध्यक्ष पांडुरंग भाट, आदी उपस्थित होते. तर महाडिकांनाच पुरस्कार विद्यमान खासदार टॉप टेन, टॉप थ्री अशी स्वत:बद्दल गौरवारती करून घेत आहेत, असे पुरस्कार कुठेच नसतात. म्हणे सर्वाधिक प्रश्न संसदेमध्ये आपण विचारले, नुसते प्रश्न विचारून काय उपयोग त्यातील किती प्रश्न निकालात काढले हे त्यांनी सांगावे. जिल्ह्यातील अनेक विकासाचे प्रश्न अधांतरीच असताना नुसत्या मिरवणाऱ्या खासदारांनी जर प्रत्यक्ष काम केले, तर मंडलिकांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार त्यांनाच दिला जाईल, अशी टीका धनंजय महाडिक यांचे नाव न घेता प्रा. संजय मंडलिक यांनी केली.
‘शाहू’च्या बिनविरोधासाठी मंडलिक गटाचा पाठिंबा
By admin | Published: August 22, 2016 12:37 AM