लांजा : मुंबई - गोवा महामार्गाचे चौपदरीकरण करताना लांजा शहरातील व्यापारी व जमीनमालक यांना प्रशासनाने पूर्वसूचनेची नोटीस तसेच जमीनमालकांना जमिनीचा मोबदला अदा न करता, रविवारी सकाळी ध्वनिक्षेपकाद्वारे शहरातील व्यापारी, खोकेधारक, फेरीवाले यांनी २६ नोव्हेंबरपर्यंत प्रशासनाने अधिग्रहण केलेली जागा खाली करावी, अशा सूचना दिल्याने लांजातील संतप्त व्यावसायिकांनी प्रशासनाविरोधात आपला रोष व्यक्त केला. दरम्यान आमदार राजन साळवी यांना याविषयीची माहिती मिळताच त्यांनी संबंधित अधिकारी व ठेकेदार यांना ४ डिसेंबरपर्यंत शहरातील कोणत्याही बांधकामाला हात लावू नये, अशा सूचना दिल्या आहेत.
मुंबई - गोवा महामार्गाचे चौपदरीकरण काम सुरू आहे. हा महामार्ग लांजा बाजारपेठेच्या मध्यातून जात असल्याने महामार्गावर दुतर्फा असलेले छोटे - मोठे ४०० ते ५०० व्यापारी उद्ध्वस्त होणार आहेत.
या व्यावसायिकांची रोजी-रोटी कायमची बुडणार आहे. महामार्ग प्रकल्पबाधित कृती समिती, लांजा यांनी वेळोवेळी प्रशासन व संबंधित अधिकारी यांना निवेदन देऊन शहरातून बायपास मार्ग काढावा अथवा हे शक्य नसल्यास साडेबावीस मीटरचे अंतर हे बाजारपेठे पुरते कमी करुन १८ मीटर करावे तसेच बाजारपेठेपुरता सिंगल पिलरवर पूल बांधण्यात यावा, अशी मागणी केली होती. तसेच खोकेधारक व व्यापारी यांना योग्य नुकसानभरपाई द्यावी, अशा मागण्या केल्या होत्या. मात्र, संबंधित यंत्रणेकडून यावर कोणतेही ठोस उत्तर देण्यात आलेले नाही. प्रशासनाकडून वेळोवेळी येथील व्यापारी, फेरीवाले, खोकेधारक यांची दिशाभूल करण्यात आली आहे.
रविवारी ध्वनिक्षेपकाद्वारे व्यापारी, खोकेधारक यांना २६ डिसेंबरपर्यंत आपले खोके, गाळे मोडून जागा मोकळी करून द्यावी, अशा सूचना देण्यात आल्याने सर्वजण संतप्त झाले आहेत. दरम्यान, याची माहिती आमदार राजन साळवी यांना समजताच त्यांनी संबंधित अधिकारी व ठेकेदार यांना दूरध्वनीवरून ४ डिसेंबरपर्यंत बाजारपेठेतील बांधकामाला हात लावू नये, अशा सूचना दिल्या आहेत. रविवारी बाजारपेठेतील व्यापारी, खोकेधारक, फेरीवाले यांच्यासमवेत मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पबांधित कृती समिती व व्यापारी संघटना यांचे पदाधिकारी यांची बैठक पार पडली.