कोल्हापूर : अवघ्या सहा दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवासाठी आता कोल्हापूरकरांची जय्यत तयारी सुरू झाली आहे. एकीकडे कुंभार गल्ल्यांमध्ये गणेशमूर्ती बनविण्यासाठी कुंभार बांधव रात्रीचा दिवस करत असताना, या लाडक्या बाप्पाला विराजमान होण्यासाठी मंडळांकडून मांडव उभारणी सुरू आहे.
या सगळ्या लगबगीने महापुरानंतर आलेली उदासीनता हद्दपार होऊन उत्सवाचे उत्साही रंग वातावरणात येत आहेत. हे करत असतानाही मंडळांनी आपल्या मांडवासमोर पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात द्या, अशा आशयाचे फलक लावले आहेत.महापुराच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव साधेपणाने होणार असला, तरी उत्सवाच्या परंपरेप्रमाणे धार्मिक विधी सर्व मंडळांकडून होणार आहेत. उत्सव आता सहा दिवसांवर आल्याने मंडळांकडून मांडव उभारणी वेगाने करण्यात येत आहे. शहरात चौकाचौकांत, रस्त्याकडेला हे मांडव उभारलेले दिसू लागले आहेत. या उभारलेल्या मांडवांवर काही मंडळांनी श्री गणेशाचे आगमन होण्यापूर्वीच पूरग्रस्तांना मदतीचे आवाहन केले आहे.डिजीटल फलकांना फाटा देत गेल्या काही वर्षांपासून हँडमेड सजावटीवर मंडळांनी भर दिला असून, यंदाही कमीत कमी खर्चात सजावट केली जाणार आहे. महापुरामुळे गणेशमूर्ती पाण्यात जाऊन कुंभार बांधवांचे मोठे नुकसान झाले आहे; त्यामुळे कुंभार बांधव एकमेकांना सावरून घेत कोल्हापूरकरांसाठी गणेशमूर्ती कमी पडणार नाहीत याची काळजी घेत आहेत.घरोघरी साफसफाईसण उत्सवानिमित्ताने आता घरोघरी साफसफाईला सुरुवात झाली आहे. घराची रंगरंगोटी, भांडी, धुणी ही कामे करण्यात अख्खे कुटुंब गुंतले आहे. काही कुटुंबांमध्ये गौरी-गणपतीला तर बहुतांशी लोक नवरात्रौत्सवाच्या आधी साफसफाई करतात.सजावटीच्या साहित्यांची जुळवाजुळवगौरी-गणपतीत आकर्षण असते ते सजावटीचे. प्रत्येक कुटुंब आपल्या घरातील आरास सगळ्यांपेक्षा हटके असली पाहिजे, यासाठी प्रयत्न करत असते. घरोघरी विशिष्ट थीमनुसार साकारणारे देखावेही खास वैशिष्ट्य असतात. या सजावटीच्या साहित्यांची जुळवाजुळव आता सुरू झाली आहे. माळावर ठेवलेले सजावटीचे साहित्य आता खाली येत आहेत. त्यांची स्वच्छता, नव्याने घ्याव्या लागणाऱ्या वस्तूंची खरेदी होत असल्याने बाजारपेठेत आता गर्दी दिसू लागली आहे.