अभय व्हनवाडे
रूकडी/माणगाव : माणगाव येथे २१ व २२ मार्च १९२० रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शाहू महाराज यांच्या उपस्थितीत झालेल्या माणगाव परिषदेस १०२ वर्षे पूर्ण झाली. मात्र याचा शताब्दी महोत्सव साजरा करण्याचा विसर राज्य शासनाला पडला आहे.
१९२० मध्ये छ. शाहू महाराजांच्या अध्यक्षतेखाली व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत माणगाव परिषद झाली. त्याचा शतकमहोत्सव दिव्य-भव्य साजरा करायचे होते, यादृष्टीने पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ व तत्कालीन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मार्च २०२० मध्ये बैठक घेतली होती. कार्यक्रमासाठी माणगाव फाटा येथे जागेची निश्चिती करून स्मारकसाठी १५९ कोटींचा निधी देण्याचा आराखडा तयार केला होता. पण कोरोनामुळे समारंभ लांबला आणि निधीलाही कात्री लागली.
परिषद झालेल्या परिसराचे सुशोभीकरणासाठी २ कोटी ३८ लाखांचा निधी मिळाला असून, यातील निधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर लंडन येथे राहत असलेल्या घराची प्रतिकृती व माणगाव परिषदेचा होलिग्राफ, परिषद परिसराचा सुशोभीकरण यासाठी खर्ची झाला. उर्वरित निधीचा थांगपत्ता नसून शतकमहोत्सवी समारंभ ही संपन्न झाला नाही.
माणगाव येथे पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ व दौलत देसाई यांच्या बैठकीमध्ये शतकमहोत्सवी समारंभ दिमाखात साजरा करण्याचे ठरले होते. कोरोनामुळे हा समारंभ रखडला आता कोरोना संपल्यामुळे कार्यक्रम घेऊन निधी द्यावा. दलित समाजाने चार एकर जागा दिली आहे तोही प्रश्न सोडवावा. -अरुण शिंगे, अध्यक्ष, बौद्ध समाज माणगाव