कोल्हापूर : आंबा पिकविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बेकायदेशीर पावडरीचा शोध घेण्यास गेलेल्या अन्न व औषध प्रशासनाच्या एका अधिकाऱ्याने स्वत:च आंब्याच्या पेटीत कार्बाईड पावडरची पुडी टाकून विक्रेत्यावर कारवाईचा दंडुका उगारला; पण अधिकाऱ्याचा हा कारनामा दुसऱ्या व्यापाऱ्याने मोबाईलमध्ये टिपल्याने अधिकाऱ्याचे बिंग फुटले आणि हे प्रकरण व्यापाऱ्यांनी धसास लावल्यानंतर अधिकाऱ्याचे धाबे दणाणले.भेसळीवर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा कडक कारवाई करीत नसल्याने भेसळीचे काम बिनबोभाट सुरू आहे. जशी अन्नधान्यात भेसळ होते, तशी फळांमध्येही भेसळ करण्याची प्रवृत्ती वाढलेली आहे. आंबा लवकर पिकविण्यासाठी व त्याला गडद पिवळा रंग यावा, यासाठी आंब्याच्या पेटीत कार्बाईड पावडर टाकली जाते. ही पावडर पेटीत उष्णता निर्माण करते व आंब्याला चांगला रंग देते. त्यामुळे शेतकऱ्यांसह व्यापारी या पावडरचा वापर करीत असल्याची तक्रार अन्न व भेसळ विभागाकडे येते. त्यानुसार हा विभाग आंबा विक्रेत्यांवर धाडी टाकून चौकशी करतो. मंगळवारी सकाळी नऊ वाजता या विभागाचे दहा -बारा अधिकारी व कर्मचारी बाजार समितीमधील फळ मार्केटमध्ये आले. त्यांनी सर्व दुकानांतील पेट्यांची तपासणी सुरू केली; पण कोठेच कार्बाईड पावडर सापडली नाही. शेवटच्या दुकानात एका पेटीत कार्बाईड पावडरची पुडी असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. याबाबत अधिकारी संबंधित व्यापाऱ्याला जाब विचारत होते; पण हा व्यापारी पुरता गोंधळून गेला. कार्बाईड आपण वापरत नसताना ही पुडी आली कोठून, असा प्रश्न त्याला पडला. तरीही कारवाईची सर्व अस्त्रे अधिकाऱ्यांनी बाहेर काढल्यानंतर व्यापाऱ्याला अधिकाऱ्यांवरच संशय आला. अधिकाऱ्यांच्या या करामतीचे एक व्यापारी आपल्या मोबाईलमध्ये चित्रीकरण करीत होता. त्याने हे चित्रीकरण दाखविल्यानंतर सर्वच व्यापारी आक्रमक झाले. त्या अधिकाऱ्याच्या अंगावर धावून जाऊन खास शैलीत समाचार घेतला. अन्न व औषध प्रशासनाच्या सहायक आयुक्तांनी मध्यस्थी करीत प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न केला; पण आक्रमक व्यापाऱ्यांनी हे प्रकरण ताणून धरले; पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या कानांवर हा प्रकार घालणार, असा पवित्रा घेतल्यानंतर अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले. बाजार समितीच्या अधिकाऱ्यांनी मध्यस्थी केल्यानंतर यावर पडदा पडला. आमच्या अधिकाऱ्यांनेच आंब्यांच्या पेटीत कार्बाईड पुडी टाकली, असे म्हणून व्यापाऱ्यांनी गोंधळ घातला. गेले आठ दिवस आम्ही बाजार समितीत कार्बाईडचा आंबा येणार नाही, यासाठी कंबर कसली आहे. त्या रागातून व्यापारी खालच्या पातळीवर जाऊन आरोप करीत आहेत, हे चुकीचे आहे. काहीही केले तरी कार्बाईडचा आंबा कोल्हापुरात येणार नाही, यासाठी प्रयत्न करणार आहे. - संपत देशमुख, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासनअन्न व धान्यात राजरोसपणे भेसळ सुरू आहे; पण याकडे हे अधिकारी दुर्लक्ष करतात. कोणीतरी तक्रार केल्याचे पुढे करीत मध्यंतरी गुळाची तपासणी केली. आता आंब्याकडे वळले आहेत. यामागे मोठे अर्थकारण दडल्याची उघड चर्चा आहे.
आंब्याने ‘आंबा’ पाडण्याचा डाव उधळला
By admin | Published: April 29, 2015 12:23 AM