कोल्हापूर : हातकणंगले तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती प्रारूप प्रभाग रचनेमध्ये पैसे घेऊन हेराफेरी आणि गंभीर चुका करण्यात आल्या आहेत. कोल्हापुरात राजकीय लोकांच्या कार्यालयात बसून नकाशे तयार करण्यात आले आहेत, असा गंभीर आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरेल, असाही इशारा त्यांनी दिला.
शेट्टी यांनी गुरुवारी राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त यूपीएस मदान यांची मुंबईत भेट घेऊन त्यांना याबाबत निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे, हातकणंगले तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गटांची रचना करीत असताना तालुक्यातील काही राजकीय लोकांनी प्रांत, तहसीलदार प्रांत यांना आपल्या कोल्हापूरच्या कार्यालयात बोलावून हवा तसा नकाशा तयार करून त्याला जिल्हाधिकाऱ्यांकडून मान्यता घेतली आहे. हेरले, रुकडी, रुई, कोरोची, भादोले या जिल्हा परिषद मतदारसंघाची रचना करत असताना राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशातील अनेक नियमांचे उल्लंघन केले आहे.
माणगावला का वगळलेरुकडी जिल्हा परिषद मतदारसंघातून आपल्याच घरात उमेदवारी देण्यासाठी काही राजकीय पुढाऱ्यांनी माणगाव हे गाव हेतुपुरस्कर बाजूला करून माणगावच्या पलीकडील साजणी, माणगाववाडी, तिळवणी ही गावे समाविष्ट केली आहेत. रुकडी गावाला अर्धा किलोमीटरसुद्धा लांब नसलेले व भौगोलिक संलग्नता असलेले माणगाव हे गाव वगळले आहे. एवढी भीती का वाटली, असा सवाल निवदेनातून उपस्थित करण्यात आला आहे.