नितीन भगवान
पन्हाळा: देशाच्या पहिल्या स्वातंत्र्यदिनाचे साक्षीदार माजी पोलीस उपविभागीय अधिकारी मनोहर दत्तात्रय बांदिवडेकर ऊर्फ नानासाहेब बांदिवडेकर पन्हाळ्यातील जेष्ठ नागरिक यांचे १०४ व्या वर्षी निधन झाले. नानासाहेब यांनी आज, बुधवारी सकाळी दिल्ली येथे अखेरचा श्वास घेतला.
देशाच्या दोन माजी पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेत असणाऱ्या नानासाहेबांनी स्वातंत्र्यपूर्व काळातील आणि नंतरचा पोलीस प्रशासनाचाही प्रदीर्घ काळ अनुभव घेतला आहे. पंडित जवाहरलाल नेहरू व लाल बहादूर शास्त्री यांच्या सुरक्षेसाठीची जबाबदारी त्यांचे वर होती.कोल्हापूर स्टेट असताना १९४३ मध्ये ते पोलीस दलात रुजू झाले. संस्थानकाळातील आणि स्वातंत्र्यानंतरही पोलीस खात्यात काम केलेले नानासाहेब हे कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव पोलीस अधिकारी होते. पदवी मिळाल्यामुळे ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांची नेमणूक केली होती. १५ ऑगस्ट १९४७ रोजी ते गडहिंग्लज पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक होते.स्वातंत्र्यदिनाच्या पहिल्या ध्वजारोहण समारंभात त्यांच्या हस्ते तिरंगा फडकवण्याचा सन्मान त्यांना लाभला होता. गेले कांही वर्षे त्यांच्या मुलीकडे ते दिल्ली येथे वास्तव्यास होते. त्यांचे मागे मुलगा, मुली नातवंडे असा परिवार आहे.