कोल्हापूर : आधुनिक श्रावणबाळ असे म्हणता येईल अशा कोल्हापूरजवळच्या शिंगणापूर येथील दोन भावंडांचा व्हिडीओ सोशल मीडियावर केवळ व्हायरलच होत नाही तर साऱ्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आणत आहे. आईवडिलांचे पांग फेडणाऱ्या या दोन भावंडांनी अग्निवीर म्हणून भरती होताच सैन्याच्या वेशात घरी येऊन आईचा जो सन्मान केला, त्याला तोड नाही.
शिंगणापुरातील महादेव पाटील यांचा २०१५ मध्ये मृत्यू झाल्यानंतर आईच्या मदतीसाठी मनोज आणि मयूर या दोघांनी हणमंतवाडीत भेळचा गाडा सुरु केला. कोरोनात हा व्यवसाय बंद पडला. त्यांना सैन्यात भरती व्हायचे ठरवले, त्यानुसार बंगळूरुमध्ये अग्निवीरची परीक्षा दिली. त्यात उत्तीर्ण झाल्यानंतर आता दोघांचीही एकाचवेळी अनुक्रमे बिकानेर आणि रांची येथे निवड झाली.
दोघांनीही सैन्याच्या वेशातच मार्च करीत आईचा सन्मान करत तिला सॅल्यूट केला आणि सैन्यातील कॅप आईच्या डोक्यावर ठेवत छातीवर लावण्यासाठी दिलेले अग्निवीरचे पदकही त्यांनी तिच्या छातीवर लावताच या घटनेचे साक्षीदार असलेल्या ग्रामस्थांनी टाळ्यांचा कडकडाट केला. त्यांनी या मुलांची मिरवणूक काढली. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दोन्ही मुले देशरक्षणासाठी निवडल्याने आईची छातीही अभिमानाने फुगली आहे.