कोल्हापूर : मानसिंग विजय बोंद्रे यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबाराने कोल्हापुरात एकच खळबळ उडाली. दसरा चौकातील श्री शाहु छत्रपती शिक्षण संस्था आणि शेत जमिनिच्या मालकी हक्कावरुन सुरु असलेल्या वादातून त्यांनी हा गोळीबार केल्याचे समोर आले आहे. अंबाई टॅंक कॉलनी, शालीनी पॅलेसनजीक घराजवळच आपल्या रिव्हॉल्व्हरमधून त्यांनी हा गोळीबार केला. ही घटना सोमवारी मध्यरात्री उघड झाली.
याप्रकरणी बोंद्रे यांच्यावर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात आज, मंगळवारी पहाटेच्या सुमारास गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यांच्या विरोधात त्यांचे चुलतबंधू अभिषेक चंद्रकांत उर्फ सुभाष बोंद्रे (रा. शालीनी पॅलेसनजीक) यांनी पोलीस ठाण्या रितसर तक्रार दिली.मध्यरात्रीच्या सुमारास बोंद्रे याने गोळीबार केल्याची माहिती मिळताच पोलिसांनी अंबाई टॅंक परिसरात घटनास्थळी धाव घेतली. पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे, सहायक पोलीस निरीक्षक अरविंद कांबळे आदींनी मध्यरात्रीच परिसरात चौकशी केली. त्यावेळी गोळीबार झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पाठोपाठ संशयित मानसिंग बोंद्रे हा सिगारेट ओढतच आपल्या कमरेचे पिस्तूल काढून अंदाधुंद गोळीबार करत असल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली.मानसिंग बोंद्रे व अभिषेक बोंद्रे या चुलतबंधूमध्ये दसरा चौकातील श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्था आणि शेतजमिनीवरुन न्यायालयात वाद सुरु आहे. त्या वादातूनच मानसिंग याने अभिषेक यांना बघुन, तुझ्या खाणदानाला संपवितो, तुझा गेम करतो असे म्हणून ठार मारण्याच्या उद्देशाने स्वता:च्या कमरेचे पिस्तूल काढून त्याच्यावर अंदाधुंद गोळीबार करुन दहशत माजविण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली.दरम्यान घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली, पोलिसांनी शालीनी पॅलेस परिसरात संशयित आरोपी मानसिंग बोंद्रे याचा शोध घेतला, पण तो मिळून आला नाही. त्याला लवकरच अटक करण्यात येईल असेही पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांनी पत्रकारांना सांगितले. याबाबत पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अरविंद कांबळे करत आहेत.