इचलकरंजी : शहर व परिसरात जॉबवर्क पद्धतीने कापड उत्पादन करणाऱ्या यंत्रमागधारकांची संख्या ४० टक्के असून, कापड व्यापाऱ्यांकडून त्यांची प्रतिमहिना दहा कोटी ७० लाख रुपयांची पिळवणूक होत आहे. परिणामी, खर्चीवाला यंत्रमागधारकांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. कापड व्यापारी संघटना मजुरीवाढीबाबत दुर्लक्ष करीत असल्याने टप्प्याटप्प्याने आंदोलन वाढविण्याचा निर्णय यंत्रमागधारकांच्या संघटनेने घेतला.इचलकरंजी शहराबरोबरच आसपासच्या रेंदाळ, वडगाव, कुरुंदवाड अशा परिसरांमधील विविध गावांमध्ये यंत्रमाग कारखाने असून, तेथेसुद्धा खर्चीवाले यंत्रमागधारकांची संख्या लक्षणीय आहे. इचलकरंजी केंद्रात असणाऱ्या एक लाख यंत्रमागांपैकी ४० हजार यंत्रमाग जॉबवर्क-खर्चीवाले पद्धतीने चालविले जातात. या यंत्रमाग कारखान्यांतून दररोज ४० लाख मीटर कापडाचे उत्पादन होते, तर आठ हजार खर्चीवाले यंत्रमागधारक असून, त्यांचे कुटुंब सदस्यसुद्धा कारखान्यांमध्ये काम करीत असतात.सध्या ५२ पीक या प्रकारचे कापड तयार करण्यासाठी प्रतिमीटर दोन रुपये ८६ पैसे मजुरी खर्चीवाले यंत्रमागधारकांना मिळते. गेली तीन वर्षे या मजुरीमध्ये वाढ झालेली नाही. मात्र, तीन वर्षामध्ये यंत्रमाग कामगारांच्या मजुरीमध्ये प्रतिमीटर १८ पैसे वाढ झाली. वीज बिलात ४० टक्के, वहिफणी मजुरीवाढ ३१ टक्के, मिल स्टोअर्सच्या भावामध्ये २० टक्के अशा प्रकारची वाढ झाली आहे. तर यंत्रमाग कामगारांबरोबर अन्य कामगारांच्या मजुरीतसुद्धा वाढ झाली आहे. म्हणून यंत्रमागधारकांनी ५२ पिकाच्या कापडासाठी चार रुपये ६८ पैसे मजुरीची मागणी केली आहे.खर्चीवाले यंत्रमागधारकांच्या कारखान्यांमध्ये कुटुंबातील महिला कांड्या भरण्याचे, तर यंत्रमागधारक स्वत: जॉबर काम करीत असतात. प्रसंगी ते स्वत: किंवा त्यांचा मुलगासुद्धा यंत्रमागावर पाळी करीत असतात. त्यामुळेच खर्चीवाले यंत्रमागधारकांना गेली तीन वर्षे कमी मजुरी मिळत असली तरी त्याच्या कुटुंबाचा खर्च चालतो. वास्तविक पाहता यंत्रमागधारक हा मालक असतानाही त्याची स्थिती कामगारासारखीच हलाखीची झाली आहे, अशी टीका इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष सतीश कोष्टी यांनी केली. (प्रतिनिधी)कापड व्यापाऱ्यांचे आडमुठे धोरणखर्चीवाले यंत्रमागधारकांकडून कापड उत्पादित करून घेऊन त्याची पुढे विक्री करणारे कापड व्यापारी सूताच्या दरात वाढ झाली की, कापडाच्या दरामध्ये वाढ करतात. तसेच सायझिंगच्या मजुरीत वाढ झाली तरीसुद्धा कापड वाढवून घेतले जाते. मात्र, खर्चीवाले यंत्रमागधारकांना महागाई होऊनसुद्धा आणि कामगारांचे पगार वाढवूनसुद्धा अधिक मजुरी दिली जात नाही, ही एक प्रकारची पिळवणूकच असल्याचे खर्चीवाले यंत्रमागधारक संघटनेचे नारायण दुरूगडे यांनी सांगितले.
रेंदाळ, वडगाव परिसरातील कारखानदारही सहभागी होणार
By admin | Published: February 10, 2016 12:47 AM