कोल्हापूर : साखरेच्या कोंडीमुळे एफआरपीचे तुकडे अटळ असल्याचे करारपत्र लिहून घेणाऱ्या कारखानदारांनी शनिवारी तोडग्यासाठी बोलावलेल्या पहिल्याच बैठकीत अवघ्या दहा मिनिटात एकरकमी एफआरपी देण्याची घोषणा केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने स्वागत केले, पण मजुरीवाढीमुळे घटलेली १४ टक्के एफआरपी शेतकऱ्यांना द्या व हा खर्च कारखान्यांनी करावा अशी मागणी लावून धरली, कारखानदारांनी प्रतिसाद न दिल्याने बैठकीतून बाहेर येऊन संघटनेने हा निर्णय होईपर्यंत धुराडे पेटू देणार नसल्याचा इशारा दिला. संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला असला तरी एकरकमी एफआरपीवर तोडगा निघाल्याचे मानले जात आहे. यंदा ऊस जास्त आहे, पावसाने हंगाम लांबणीवर पडला आहे. वादळी वाऱ्याने पिक आडवे झाले आहे. त्यामुळे हंगाम कधी एकदा सुरु होतो अशी शेतकऱ्यांची मानसिकता आहे. शिवाय शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपीमधूनही किमान २८०० ते तीन हजार रुपयांपर्यंत मिळणार असल्याने हाच तोडगा होण्याची शक्यता आहे. दराचा निर्णय झाला तरी हंगाम दिवाळी झाल्यावरच गती घेणार आहे.जिल्ह्यातील कारखान्यांचा गळीत हंगाम सुरु झाला आहे, पण ऊस परिषद झाल्याशिवाय हंगाम घेतल्यास आंदोलनाचा भडका उडेल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी होणाऱ्या २० व्या उस परिषदेच्या दोन दिवस आधीच शनिवारी शासकीय विश्रामगृहावर कारखानदारांची बैठक झाली.
भाजप कारखानदारांची पाठबैठकीत भाजपशी संबंधित शाहू, राजाराम, वारणा कारखान्यांच्या प्रतिनिधीनी पाठ फिरवली. समरजित घाटगे, आमदार विनय काेरे, महादेवराव महाडीक बैठकीला अनुपस्थित होते. शिवाय या बैठकीला स्वाभिमानी वगळता अन्य शेतकरी संघटनांना आमंत्रणही नव्हते.