कोल्हापूर : गरजू आणि वंचितांचीही दिवाळी आनंदी करण्यासाठी ‘नको असेल ते द्या; हवे असेल ते घेऊन जा’ हे ब्रीदवाक्य घेऊन कोल्हापूरांतील सीपीआर चौकात शनिवारपासून ‘माणुसकीची भिंत’ उभी राहत आहे. सकाळी दहा वाजता आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते गरजूंना कपडे वाटप करून या उपक्रमाची सुरुवात होणार आहे. रविवारी रात्री आठ वाजेपर्यंत सुरू राहणाऱ्या या उपक्रमात नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
गोरगरिबांची दिवाळी आनंंदाने साजरी व्हावी, त्यांना किमान नवे-जुने वापरण्यायोग्य कपडे मिळावेत, या उद्देशाने यंदाच्या मागील वर्षापासून हा उपक्रम सुरू झाला. गतवर्षी सुरू झालेल्या उपक्रमाला कोल्हापूरकरांनी उदंड प्रतिसाद दिला होता. यंदाच्या वर्षी पुन्हा दिवाळीच्या पूर्वसंध्येला शनिवारी व रविवारी असा दोन दिवस हा उपक्रम सुरू होत आहे. त्यासाठी सीपीआर चौकात भव्य मंडप उभारण्यात आला आहे.
सीपीआर चौकात दोन दिवस कपडे स्वीकारणे व त्याचे वाटप असा दुहेरी कार्यक्रम होणार आहे. चौकात उभारलेल्या मंडपात लोकांंनी कपडे देण्याचे व त्याच वेळी गरजूंनी हवे ते कपडे घेऊन जाण्याचे नियोजन केले असल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे.
गेले चार दिवस कसबा बावडा येथील आपले हॉटेल व महाराष्ट्र गॅरेज, अजिंक्यतारा कार्यालय, बालाजी कलेक्शन, दसरा चौकातील मुस्लिम बोर्डिंग येथे दातृत्ववान कोल्हापूरकरांनी कपडे आणून दिले आहेत.
या उपक्रमाच्या संयोजनासाठी आमदार सतेज पाटील यांच्या मदतीने सुधर्म वाझे, गणी आजरेकर, सचिन पाटील, प्रशांत पोकळे, प्रसाद पाटील, अमर पाटील, सूरज पाटील, निनाद कामत, इम्तियाज मोमीन, डॉ. देवेंद्र रासकर, आदी परिश्रम घेत आहेत.
वापरात येतील असे कपडे द्यागरजूंना वापरता येतील असेच कपडे दान करावेत. कपडे देताना ते स्वच्छ धुऊन, इस्त्री करून आणि पुरुष, मुले आणि महिला अशी वर्गवारी करून दिल्यास ते गरीब गरजूंना अधिक चांगल्या पद्धतीने देता येतील.
सीपीआर चौक हे गर्दीचे ठिकाण असल्याने कपडे दान करण्यासाठी येणाºया लोकांनी आपल्या गाड्या इतरांना त्रास होणार नाही, अशा पद्धतीने पार्क कराव्यात, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.