कोल्हापूर : दिवाळीनिमित्त सारे शहर आनंदात आहे, खरेदीत मग्न आहे. हे घडत असतानाच एक घटक या साऱ्यांपासून अलिप्त आहे. दिवाळी असली तरी त्याच्याकडे अंग झाकण्यापुरतेही कपडे नाहीत. हीच गोष्ट खटकली आणि काही युवकांच्या संकल्पनेतून ‘माणुसकीची भिंत’ कोल्हापुरातील सीपीआर चौकात उभी राहिली. आता घरातील अधिकचे कपडे या भिंतीवर आणून ठेवले जातात. गरजू त्यांच्या मापानुसार ते घेऊन जातात. गुरुवारपासून सुरू झालेली ही भिंत गोरगरिबांसाठी आधारवड ठरते आहे. प्रसाद पाटील यांनी या भिंतीची संकल्पना ‘व्हॉट्स अॅप’वरील एका ग्रुपवर मांडली. त्यास आमदार सतेज पाटील यांनी पुढाकार घेत प्रोत्साहन दिले. यामध्ये मुस्लिम बोर्डिंग हाऊसचे चेअरमन गणी आजरेकर यांनी या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यास समाजातील मान्यवरांनी पाठिंबा दर्शविला व दोनच दिवसांत शहरात ‘माणुसकीची भिंत’ उभी राहिली. पहिल्याच दिवशी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत जुने- नवे कपडे, ड्रेस, स्वेटर्स, ब्लेझर्स पॅँट्स, कुर्ते, जीन्स, लहान मुलांचे कपडे, साड्या, कानटोपी, स्कार्फ ‘माणुसकीच्या भिंती’वर आणून ठेवल्या. सकाळी आठपासूनच मदतीचा ओघ सुरू होता. कोल्हापुरातील सीपीआर चौकात गुरुवारी ‘माणुसकीची भिंत’ संकल्पनेतून गोरगरिबांना कपड्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी महापौर अश्विनी रामाणे, आमदार सतेज पाटील, गणी आजरेकर, प्रसाद पाटील आदी उपस्थित होते.
कोल्हापुरात उभारलीय ‘माणुसकीची भिंत’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2016 12:05 AM