कोल्हापूर -वर्षातील दोन मोठ्या उल्कावर्षांवांपैकी एक उल्का वर्षाव पाहण्याची संधी रविवारी रात्री उशिरा जिज्ञासू नागरिकांनी साधली. अनेकांनी मसाई पठारासह उंच ठिकाणी जावून हा उल्कावर्षाव पाहिला.रात्रीच्यावेळी निरभ्र आकाशातून अचानक प्रकाशमान गोल क्षणार्धात चमकून खाली येताना दिसतात. काहीजण याला ह्यतुटलेला ताराह्ण असेही म्हणतात. १३ डिसेंबरच्या रात्री १२ ते २ या वेळेमध्ये मोठ्या प्रमाणावर उल्का वर्षाव होणार असल्याचे आधीच जाहीर झाले होते. समाजमाध्यमांद्वारे ही माहिती अनेकांना मिळाली होती. त्यामुळे नागरिकांनी यासाठी खास नियोजन केले होते.
खगोलशास्त्र अभ्यासक डॉ. अविराज जत्राटकर यांच्यासह चिल्लर पार्टीच्या २७ सदस्य महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह गिरगाव परिसरात गेले होते. त्यात उदय संकपाळ, रोहित कांबळे, राजेंद्र नाईक यांच्यासह महिलांनी या ठिकाणी खाली झोपून आकाशाकडे पाहिल्यानंतर एकावेळी अनेक उल्का कोसळताना पाहावयास मिळते.
महालक्ष्मीनगरमधील विज्ञानप्रेमी सुशील हंजे, स्नेहा हंजे, अथर्व देशपांडे हे देखील मसाई पठारावर गेले होते. या ठिकाणी जेऊर येथील ॲडव्हेंचर क्लबच्यावतीने यासाठी खास आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये पालकांसमवेत लहान मुलेही सहभागी झाली होती. एका तासामध्ये ७० हून अधिक उल्का कोसळताना यावेळी पाहावयास मिळाल्या.