शिवाजी सावंत ल्ल गारगोटीशासनाच्या दप्तर दिरंगाईने गेली १८ वर्षे १९ गावांतील हजारो हेक्टर क्षेत्र पाण्यापासून वंचित ठेवले गेले असून, ‘पांढरा पट्टा’ समजला जाणारा हा भाग ‘हरित पट्टा’ कधी होणार? लोकप्रतिनिधी आणि शासनाच्या वेळकाढूपणामुळे हजारो शेतकरी देशोधडीला लागण्याची वेळ आली आहे, तर अतिशय कमी खर्चात होऊ शकणारी उपसा सिंचन योजना कधी सुरू होणार आहे, याकडे या भागातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.भुदरगड तालुक्यातील मिणचे खोरी व टिक्केवाडी, पंडिवरे, परिसरातील १९ गावांतील शेतकऱ्यांच्या शेतीला बसूदेव-भुजाई जल उपसा सिंचन योजनेतून पाणी मिळण्यासाठी आणि या भागातील हरितक्रांतीचे स्पप्न साकार करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारकडून मंजुरीची आवश्यकता आहे. ही योजना अमलात आल्यास १९ गावांतील ५८३८ हेक्टर शेतीचे क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. जमीन ओलिताखाली येऊन पडीक जमिनीचा विकास होण्यास वाव मिळणार आहे. तर या भागातील शेतकरी फळबागा, ऊस लागवड, द्राक्षे, चहा, कॉफीचे मळे फुलविण्यास उत्सुकतेने वाट पाहत आहे. भुदरगडचे भूमिपुत्र असलेले पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या दूरदृष्टीतून बसुदेव-भुजाई जलसिंचन योजना कार्यान्वित व्हावी, ही शेतकऱ्यांची इच्छा आहे.तालुक्यातील १९ गावे नदीपात्र, नैसर्गिक जलस्रोत, कालव्याच्या पाण्यापासून वंचित आहेत. पाटगाव, फये, काळम्मावाडी धरणाच्या डाव्या-उजव्या कालव्यातूनही या गावांना पाणी मिळत नसल्याने विहीर किंवा बोअरवेलवर अवलंबून राहावे लागत आहे; परंतु भूजल पातळी कमालीची खालावल्याने खडकाळ भागातील जमिनीला पाणी मिळत नाही. या भागातील शेतकरी पावसाच्या पाण्यावरच आपली शेती पिकवीत आहेत. इथला शेतकरी तालुक्यातील इतर भागापेक्षा अधिक दैवाधीन आहे. आजूबाजूच्या कालव्याशेजारील गावे सुजलाम् सुफलाम् झाली आहेत; पण अजूनही बसुदेव भुजाई पठार पाण्यापासून वषार्नुवर्षे वंचितच आहे.बसुदेव-भुजाई जलसिंचन योजनेचा आराखडा शासनाला १९९८ ला मंजुरीसाठी पाठविला आहे. या योजनेचा सर्व्हे होऊन १८ वर्षे पूर्ण झाली आहेत. या योजनेसाठी काळम्मावाडी धरणाच्या उजव्या कालव्यापासून कासारपुतळे-धामणवाडी हद्दीतून उपसा सिंचन योजनेची सुरुवात करण्याचा प्रस्ताव असून, तीन टप्प्यांत याची विभागणी करण्यात आली आहे. (पूर्वार्ध)भिजणारे क्षेत्र : येणारा खर्च फारच कमीया उपसा जलसिंचन योजनेतून पहिल्या टप्प्यात ७२ मीटर उंचीवर व २७० मीटर लांबीवर पाणी उपसा करून तेथून पुढे ७२० मीटर पाटाने पाणी आणावयाचे आहे. दुसऱ्या टप्प्यात १०५ मीटर उंचीवर ४२० मीटर इतक्या लांबीवर पाणी उपसा करून ६२0 मीटर पाटाने पाणी न्यावयाचे आहे. तिसऱ्या टप्प्यात ४५ मीटर उंचीवर ३२० मीटर लांबीवर पाणी उपसा करावयाचा आहे. एकूण २३५० मीटर लांबीमध्ये १३४० मीटर इतक्या लांबीने पाटाने पाणी वाहणार आहे. त्यामुळे योजनेचा खर्च कमी असून, भिजणारे क्षेत्र व येणारा खर्च हा तुलनेने फारच कमी आहे. यामध्ये ही योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे.लोटेवाडी, पंडिवरे, मोरस्करवाडी, अप्पाचीवाडी, बोंगार्डेवाडी, उंदरवाडी, धामणवाडी, मिणचे बुद्रुक, पाचवडे, नाधवडे, कूर, भुजाई पठार, देसाईवाडी, न्हाव्याचीवाडी, सरवडे ही गावे पाण्यापासून वंचित आहेत.
शासनाच्या दप्तर दिरंगाईने अनेक शेतकरी देशोधडीला
By admin | Published: April 06, 2017 12:49 AM