कोल्हापूर : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या धुवाधार पावसामुळे कोल्हापूर शहरातील रामानंदनगर, सुतारवाडा, शाहुपुरी कुंभार गल्ली, मुक्त सैनिक वसाहत येथील अनेक घरांत पुराचे पाणी शिरल्याने शहरवासीयांना धडकी भरली. पावसाने दिवसभर तारांबळ उडविली. महापालिका अग्निशमन दलांच्या जवानांनी तत्काळ धाव घेऊन घरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविले. पुराच्या पाण्यामुळे अनेक कुटुंबांना स्थलांतर करावे लागले.
शहराच्या सर्वच भागात अतिवृष्टी झाल्यामुळे लहान-मोठे ओढे, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. मोठी गटारी, ड्रेनेजमधून मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर पडून रस्त्यावर आल्याने अनेक ठिकाणी रस्त्यांनाच ओढ्यांचे स्वरूप आले आहे. सखल भागात तसेच ओढ्यांच्या काठावर घरे बांधून राहिलेल्या नागरिकांची आजच्या पावसाने झोप उडाली आहे.
पंचगंगा नदीला पूर आल्यामुळे जयंती नाल्यातील पाणीच्या प्रवाह थांबला आहे. त्यातच रात्रभर कोसळणाऱ्या तुफान पावसाने कळंबा तलाव काठोकाठ भरला आणि त्यातील पाणी सांडव्यावरून वेगाने बाहेर पडले. त्यामुळे रामानंदनगर पुलावर पाणी आले. तसेच रामानंद नगरातील शंभरहून अधिक घरांत पाणी शिरले. पहाटे दारात पाणी आल्याने नागरिकांची धावपळ उडाली. घरातील साहित्य पहिल्या माळ्यावर नेऊन ठेवण्याची लगबग सुरू झाली. बघता बघता अनेक घरांत पाणी शिरले.
अग्निशमन दलाची पथके तत्काळ तेथे पोहोचली. त्यांनी नागरिकांना घरातून बाहेर पडण्याचे आवाहन केले. पण नागरिकांनी घरातून बाहेर पडण्यास नकार दिला. दरम्यान, त्याठिकाणी आमदार ऋतुराज पाटील, माजी नगरसेवक मधुकर रामाणे पोहोचले. त्यांनी अग्निशमन दलाची बोट घेऊन जाऊन नागरिकांना बाहेर पडण्याची विनंती केली. पाण्याची पातळी आणखी वाढण्याअगोदर बाहेर पडा, अशी विनंती करताच नागरिकांनी बाहेर पडण्यास सहमती दिली. जवळपास पन्नास घरांतील नागरिकांना बोटीतून बाहेर काढण्यात आले.
-कुंभार बांधवांची उडाली धावपळ-
शहरातील शाहुपुरी कुंभार गल्ली, सहावी गल्ली परिसरातील बऱ्याच घरांतून पाणी शिरले. नागरिकांनी स्वत:हून घरातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. काही कुटुंबांनी केलेल्या गणेशमूर्तीसुद्धा सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आली. पुराच्या पाण्याने वेढल्यामुळे सहाव्या गल्लीतील सर्वच दुकाने बंद ठेवण्यात आली. सुतारवाडा नागरी वस्तीत पाणी शिरले. तेथील सर्वच कुटुंबांना नजीकच्या चित्रदुर्ग मठात स्थलांतर करण्यात आले. मुक्त सैनिक वसाहत परिसरातही अनेक घरांच्या उंबऱ्यांपर्यंत पाणी पोहोचले आहे. रस्ते पाण्यात बुडाले आहेत. त्याठिकाणी आमदार चंद्रकांत जाधव यांनी भेट देऊन पाहणी केली.
-अधिकारी धावले मदतीला -
शहरावर पुराचे संकट ओढवल्यामुळे महापालिका यंत्रणा सक्रिय झाली. प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, मुख्य अग्निशमन अधिकारी रणजित चिले, उपमुख्य अग्निशमन अधिकारी तानाजी कवाळे, सहायक अधिकारी मनीष रणभिसे यांनी तत्काळ पुराचे पाणी शिरलेल्या नागरी वस्तींना भेटी दिल्या आणि नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे काम सुरू केले.