बाजीराव फराकटे।शिरगाव : राधानगरी-भुदरगड-आजरा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत उभे राहण्यासाठी आजी, माजी आमदार यांच्यासह अन्य इच्छुक उमेदवारांची स्पर्धा लागली असून, पळा पळा कोण पुढे पळते ! अशीच जणू स्पर्धा लागल्याचे चित्र दिसत आहे. अजून निवडणुकीला वर्षभर वेळ आहे. पण इच्छुक उमेदवारांनी आत्तापासून तरूण मंडळांच्या भेटीगाठी घेण्यास सुरूवात केली आहे.
शिवसेनेचे विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर, राष्टÑवादीचे माजी आमदार के. पी. पाटील, राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, ‘गोकुळ’चे संचालक व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अरूण डोंगळे, माजी आमदार दिनकरराव जाधव यांचे चिरंजीव सत्यजित जाधव, माजी आमदार बजरंग देसाई यांचे चिरंजीव भाजपचे राहुल देसाई, संदीप पोवार, उद्योजक चंद्रकांत पाटील (कौलवकर), जिल्हा परिषद सदस्य जीवन पाटील, आजरा कारखान्याचे अध्यक्ष अशोकराव चराटी, माजी सभापती संजयसिह कलिकते यांच्यासह शेकाप, जनता दल सेक्युलर, स्वाभिमानी शेतकरी संघटना व अन्य पक्ष या निवडणुकीत उतरण्याची शक्यता आहे.
हा मतदारसंघ सध्या शिवसेनेच्या ताब्यात आहे. त्यामुळे विद्यमान आमदार म्हणून शिवसेना पुन्हा एकदा आमदार प्रकाश आबिटकर यांना उमेदवारी देणार यात शंका नाही. भाजपचे नेते पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा हा घरचा मतदारसंघ आहे. त्यामुळे ते या मतदारसंघातून लढणार असल्याचे बोलले जाते. त्यांची उमेदवारी असेल तर या मतदारसंघात चुरशीची लढत होणार यात शंका नाही.
उद्योगपती चंद्रकांत पाटील (कौलवकर) यांनी गेली पाच-सहा महिने गावागावांत तरुण मंडळाच्या माध्यमातून स्पर्धा, विविध समाजोपयोगी उपक्रम हाती घेतले आहेत. कार्यक्रमाच्या माध्यमातून जनसंपर्क वाढविला आहे. आमदार आबिटकर यांनी विकासकामे खेचून आणली असून, त्या जोरावर ते पुन्हा एकदा सज्ज झाले आहेत. राष्ट्रवादीची उमेदवारी माजी आमदार के. पी. पाटील यांना मिळाली तर मात्र त्यांचे मेहुणे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील हे निवडणूक लढविणारच, पण त्यांचा पक्ष कोणता असेल हे आजतरी सांगता येत नाही. त्यांच्या कार्यकर्त्यांचा फारच आग्रह आहे.
ए. वाय. यांची कार्यकर्त्यांत मिळून मिसळून वागण्याची पद्धत ही लोकांना भावत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व ‘गोकुळ’चे संचालक अरूण डोंगळे हे गेली अनेक वर्षे चर्चेत आहेत. ते यावेळी कोणत्याही परिस्थितीत उभे राहणार यात शंका नाही. त्यांनीही मतदारसंघात संपर्क वाढविला आहे. त्यांना मानणारा एक मोठा वर्ग गावागावांत आहे व सोबत गोकुळची सत्ता आहे, हे मोठे भांडवल आहे. ‘गोकुळ’चे दुसरे एक संचालक धैर्यशील देसाई यांनी आपल्या बंधूंच्या विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे .
माजी जि. प. सदस्य राहुल देसाई यांनी वडील माजी आमदार बजरंग देसाई यांच्या सत्तेचा वारसा जपण्यासाठी गेले वर्षभर गावागावांत संपर्क वाढविला आहे. त्यांना भाजपची उमेदवारी मिळते काय हे महत्त्वाचे आहे. राष्ट्रवादीचे जि. प. सदस्य जीवन पाटील यांनीसुद्धा मतदारसंघात चाचपणी सुरू केली आहे. त्यांना महाडिक कुटुंबियांचा वरदहस्त आहे, त्यामुळे तेसुद्धा जोरात आहेत. माजी आमदार दिनकरराव जाधव यांनी आपला राजकीय वारसदार म्हणून चिरंजीव सत्यजित जाधव यांना विधानसभा निवडणुकीत उतरविण्याचे ठरवले आहे. त्यांनीही संपर्क वाढविला आहे. भाजपचे संदीप पोवार यांनी सुद्धा संपर्क वाढविला आहे. राष्टÑवादीचे नेते व माजी आमदार स्वर्गीय गोविंदराव कलिकते यांचे चिरंजीव संजयसिंह कलिकते यांना जुन्या कार्यकर्त्यांनी शेकापमधून लढा म्हणून त्यांना आॅफर दिली आहे. त्यांच्या भूमिकेला मोठे महत्त्व येणार आहे. सरकारमधील एका पक्षातर्फे त्यांना निवडणूक लढविण्याची आॅफर आली आहे.राधानगरी, भुदरगड व आजरा तालुक्यांत मतदारसंघ विखुरलेलाआजी, माजी आमदार यांच्यासह अन्य इच्छुक उमेदवारांची स्पर्धातरूण मंडळाच्या माध्यमातून स्पर्धा, समाजोपयोगी उपक्रमांना मदतपालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा घरचा मतदारसंघ असल्याने ते येथून निवडणूक लढणार असल्याची चर्चा या मतदारसंघात उमेदवारांच्या भाऊगर्दीमुळे सध्यातरी पळा पळा कोण पुढे पळतो, अशी स्पर्धा लागल्याचे चित्र दिसत आहे.