कोल्हापूर : कोणालाही राज्यात मध्यावधी निवडणुका नको आहेत. त्यामुळेच मध्यावधीच्या भीतीने अनेक आमदार भाजपमध्ये येऊ शकतात, असा गौप्यस्फोट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला.कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत त्यांनी महाविकास आघाडीवर सडकून टीका केली.
ते म्हणाले, महाविकास आघाडी सरकारमुळे काेणीही समाधानी नाही. शेतकऱ्यांच्या वीज तोडणीच्या प्रश्नावर आमच्याबरोबर सर्व पक्षाचे आमदार आले. त्यामुळे त्यांना तीन महिने वीज तोडणार नाही, असा निर्णय घ्यावा लागला.नवाब मलिकांची खाती गुपचूपपणे काढून घेतली. तसाच त्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय सोडणार नाही. संजय राऊत यांच्याबद्दल काहीही बोलणार नाही. दिवा विझण्यापूर्वी मोठा होतो, तशी त्यांची अवस्था झाली आहे. ते म्हणाले, एस. टी. कर्मचाऱ्यांनी किती दिवस संप करायचा सोमवारी याबाबत सरकारला जाब विचारणार आहे.
मराठा समाजाची फसवणूक सहन करणार नाही
ज्या मागण्या शासनाने मान्य केल्या आहेत त्या पूर्ण करून घेण्याकडे लक्ष द्या. असे मी खासदार संभाजीराजे यांनी उपोषण सोडल्यानंतर लगेचच म्हणालाे होतो. पुढे काहीही झालेले नाही. मराठा समाजाची फसवणूक आम्ही सहन करणार नाही. देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा समाजासाठी, विद्यार्थ्यांसाठी ज्या योजना सुरू केल्या होत्या, त्यासुद्धा सुरू करण्यासाठी हे सरकार तयार नाही, हे सहन करणार नाही.
महाविकास आघाडीचे २५ आमदार संपर्कात : दानवे
महाविकास आघाडीचे २५ आमदार अधिवेशनावर बहिष्कार टाकणार होते, परंतु ते सावरले आणि बहिष्कार टाकला नाही. जशा निवडणुका लागतील, तसे ते सर्वजण भाजपात येतील आणि ते आमच्या संपर्कात असा दावा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शुक्रवारी एका वृत्तवाहिनाशी बोलताना केला.