कोल्हापूर : कोरोनाचा संसर्ग काहीसा कमी होत असताना कोल्हापूर शहरात डेंग्यू, चिकुनगुण्याची साथ पसरत आहे. या साथीचे बुधवारपासून सर्वेक्षण पुन्हा सुरू करण्यात आले. महापालिकेने जुलै महिन्यात केलेल्या सर्वेक्षणात डेंग्यूचे २० रुग्ण आढळल्याची नोंद असली तरी प्रत्यक्षात हा आकडा जास्त असण्याची शक्यता आहे.
जून महिन्यात पावसाला सुरुवात झाली की, डेंग्यू, चिगुनगुण्या यासह सर्दी, खोकला, ताप यासारखे आजार डोके वर काढतात. त्यामुळे जनरल प्रॅक्टिस करणाऱ्या दवाखान्यात अशा रुग्णांची संख्या वाढत असते. महापालिका आरोग्य विभाग देखील प्रत्येक वर्षी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करते. परंतु, गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यासह कोल्हापूर शहरात कोरोनाचा संसर्ग असल्यामुळे प्रशासनाने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर अधिक भर दिला आहे. त्यामुळे यंदा डेंग्यू, चिकुनगुण्याच्या सर्वेक्षणात व्यत्यय येत आहे.
आरोग्य विभागाने बुधवारपासून दि. ५ ऑगस्टपर्यंत विशेष डेंग्यू प्रतिबंधात्मक मोहीम राबविण्याचा निर्धार केला आहे. रोज सहा प्रभागात ही मोहीम राबविण्यात येणार असून, घराघरांत जाऊन सर्वेक्षण करणे, डासांचे उत्पत्ती स्थान नष्ट करणे, औषध फवारणी करणे, धूर फवारणी करणे, नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळणेबाबत प्रबोधन करणे, आदी स्वरूपाची कार्यवाही करण्यात येत आहे.
बुधवारी शहरातील फिरंगाई, तटाकडील तालीम, रंकाळा स्टॅंड, चंद्रेश्वर, पद्माराजे, संभाजीनगर बस स्थानक या प्रभागात मोहीम राबविण्यात आली. औषध व धूर फवारणी करण्यात आली. घराघरांत जाऊन तपासणी करण्यात आली. दूषित, डासांच्या अळ्या आढळलेल्या कंटेनरमध्ये टेमीफाॅस औषध टाकून अळ्या नष्ट करण्यात आल्या.
नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळण्याचे तसेच सर्व खासगी लॅब धारकांनी त्यांच्या तपासणीमध्ये डेंग्युचे रुग्ण आढळल्यास त्याबाबतची माहिती महापालिकेत आरोग्य प्रशासन विभागास कळवावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे..
-व्यावसायिकास दोन हजार दंड -
शिवाजी पेठ परिसरात विक्रीसाठी तयार करण्यात आलेल्या सेफ्टिक टाकीमध्ये पाणी साचून डास उत्पत्ती होत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे सर्वेक्षणास गेलेल्या कर्मचाऱ्यांनी संबंधित व्यावसायिक सह्याद्री सिमेंट पाईप्सच्या मालकांना दोन हजार रुपयांचा दंड करण्यात आला.
-बुधवारचे सर्वेक्षण-
एकूण तपासलेली घरे - २९५३
तपासलेले कंटेनर - २९५३
दूषित आढळलेल्या कंटेनर -१६३